कोल्हापूर • प्रतिनिधी
प्रत्येक क्षेत्रातील राजकारणावर आधारित ‘गुलाल’ आणि गेल्या ५० वर्षातील शहराचे प्रथम नागरिकपद भूषविलेल्या लोकप्रतिनिधींचे व्यक्तिमत्त्व उलगडणारे ‘कोल्हापूरचे महापौर’ या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे शुक्रवारी (दि.२५) सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्ह्यातील खासदार, आमदार यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती आहे. येथील अक्षरदालन प्रकाशन संस्थेतर्फे ही दोन्ही पुस्तके प्रकाशित होणार आहेत.
राजकारणावर आधारित ‘गुलाल’ या पुस्तकाचे लेखन पत्रकार गुरूबाळ माळी यांनी केले आहे. कोल्हापूर महापालिकेस ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत झालेल्या ५० महापौरांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे ‘कोल्हापूरचे महापौर’ हे पुस्तक गुरुबाळ माळी, आप्पासाहेब माळी व सतीश घाटगे यांनी लिहिले आहे. या दोन्ही पुस्तकांचा प्रकाशन समारंभ माजी महापौर संघटना व अक्षर दालनच्यावतीने होणार आहे.
५० वर्षात वेगळा विक्रम नोंदविणाऱ्या माजी महापौरांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. पत्रकार गुरुबाळ माळी यांच्या पत्रकारितेस तीस वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल पाटील, खासदार संजय मंडलिक, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार पी.एन. पाटील, आमदार डॉ. विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, आमदार सदाभाऊ खोत, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजूबाबा आवळे व आमदार जयंत आसगावकर यांची प्रमुख उपस्थिती आहे.
या संयुक्त कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन माजी महापौर संघटनेचे निमंत्रक आर. के. पोवार व अक्षर दालनचे अमेय जोशी यांनी केले आहे.