कोल्हापूर • प्रतिनिधी
लॉकडाऊनचे अन्यायी निर्बंध शिथिल करून तीन महिन्याच्या प्रदीर्घ कालावधीनंतर व्यापार सुरू करण्यास मिळालेली परवानगी कायम रहावी, यासाठी व्यापारी व ग्राहक दोन्ही घटक स्वयंशिस्त पाळतील व व्यापार कायम सुरू ठेवतील असा विश्वास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष व राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केला.
राज्य सरकारने रात्री उशिरा कोल्हापूर शहरातील व्यापार सुरू करण्यास प्रायोगिक तत्वावर मान्यता दिली. त्यामुळे आज सोमवारपासून कोणत्याही परिस्थितीत व्यापार सुरू करायचाच असा निर्धार केलेल्या ‘राजारामपुरी व्यापारी असोसिएशन’ तर्फे आज आंदोलनाऐवजी आनंदोत्सव साजरा केला व कोरोना प्रतिबंधक उपायांची माहिती देण्यासाठी रॅलीचे आयोजन केले.
जनता बझार चौकात असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष प्रशांत पोकळे, सेक्रेटरी रणजित पारेख, सहसचिव विजय येवले, खजानीस अनिल पिंजाणी, संचालक माणिक पाटील-चुयेकर, स्नेहल मगदुम, दिपक पुरोहित, भरत रावळ, इंदर चौधरी, शाम बासराणी, युवराज राणिंगा, मनोज शहा यांच्यासह विविध व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला उद्योजिका सौ. रक्षा राऊत यांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी असोसिएशनतर्फे ‘मास्क नाही – प्रवेश नाही’ या अभियानाचे स्टीकर्स व बॅनर्स व्यापार्यांना वितरीत करण्यात आले व रॅलीद्वारे कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ललित गांधी यांनी व्यापार सुरू करण्यास परवानगी मिळण्याकामी सहकार्य केल्याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील, आम. चंद्रकांत जाधव, जिल्हापोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त व प्रभारी जिल्हाधिकारी कांदबरी बलकवडे तसेच व्यापार्यांच्या प्रश्नाला वाचा फोडून दबाव ठेवण्यात सहकार्य केलेली सर्व प्रसारमाध्यमे यांना धन्यवाद दिले. तसेच तीन महिन्याच्या लॉकडाऊनसह वर्षभरातील निर्बंधामुळे अडचणीत आलेल्या व्यापार्यांना मदतीसाठी सरकारकडे पाठपूरावा करू असे सांगितले.
सभेनंतर व्यापार्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना धन्यवाद दिले व पुढील उपाययोजनांबद्दल सविस्तर चर्चा केली.