![]() |
कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूरचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा हा सदैव प्रेरणा देणारा आहे. त्यामुळं ब्रँड कोल्हापूरकरांनी याची जाणीव मनात कायम ठेवून कोल्हापूरचे नावलौकिक मिळवण्यासाठी भविष्यातील वाटचाल करावी. असं प्रतिपादन राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी केले. ते हॉटेल सयाजी येथे आयोजित ब्रँड कोल्हापूर गौरव समारंभाप्रसंगी बोलत होते. हा गौरव सोहळा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील व आम. ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी बोलताना प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी स्वतःच गाव, स्वतःचे अस्तित्व, स्वतःची संस्कृती ही आपल्यासोबत अदृष्य स्वरूपात असते. माझ्या जडण घडणीत हे गाव नसतं तर मी इथपर्यंत पोहचू शकलो नसतो. त्यामुळं आपण कोणत्याही क्षेत्रात वाटचाल करताना गावाचा तितकाच वाटा असतो. जगात कुठेही असाल तर कोल्हापूरचे नाव घेतले जाते. कोल्हापूरला दोन हजार वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलेचा समृद्ध वारसा आहे. आरक्षणाची सुरवात सर्वप्रथम कोल्हापूर झाली, चित्रपट निर्मिती कोल्हापुरात आली, पहिला कॅमेरा कोल्हापूरात बनला, देशासाठी पाहिलं ऑलम्पिक पदक कोल्हापूरात आणले, त्यामुळं कोल्हापूर हे सुरवातीपासूनच ब्रँड आहे. त्याचबरोबर शेती, संस्कृती, कला आणि क्रीडा या सर्वांचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. मी गगराणी असतांना मराठी किती कुशलतेने बोलत असं मला विचारले जायचे. कोल्हापुरात सगळ्या भाषा या मराठीतून बोलल्या जातात. त्यामुळं कोल्हापूरच्या भाषेत अनेक वैशिष्ट्य आहेत. कोल्हापूरचे साहित्य, कृषी आणि उद्योग क्षेत्र हे प्रेरणा देणारे आहे. ब्रँड कोल्हापूर असलेल्या सर्वांना कोल्हापूर शहराने ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा दिलेला आहे. याची जाणीव सतत मनात ठेवून ब्रँड कोल्हापूरकरांनी पुढील वाटचाल करावी असं प्रतिपादन भूषण गगराणी यांनी केलं.
याप्रसंगी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर म्हणून आपण बाहेर फिरतांना कोल्हापूरची ओळख ही तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापुरी चप्पल एवढीच होती. मात्र यापलीकडेही कोल्हापूरची ओळख आहे. कोल्हापुरात विविध क्षेत्रात अनेक रत्न आहेत. त्यांनी सर्वत्र नावलौकीक मिळवलाय. त्यामुळं ही कोल्हापूरची रत्ने आहेत ती पुढे आली पाहिजेत. त्यांची जगभर ओळख झाली पाहिजे. सद्या माहिती तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचे जग आहे या जगात कोल्हापूरचे नाव स्वतः आपणच पुढे नेले पाहिजे. आपलं ब्रँडिंग आपणच केलं पाहिजे. यासाठी ब्रँड कोल्हापुर असल्याचं सांगितले. ब्रँड कोल्हापूरसाठी प्रत्येकाने अग्रेसर झाले
पाहिजे. कोल्हापूर, नागपूर आणि औरंगाबाद हे तीन शहरे राज्यात विविध क्षेत्रात अग्रेसर आहे. खाद्य संस्कृतीत इंदोर जसे प्रसिद्ध आहे. तसे कोल्हापूरही प्रसिद्ध झाले पाहिजे. आयटी क्षेत्रात आपण पुढे कसे जाऊ शकतो, खाद्य संस्कृतीमध्ये आणखी पुढे कसे जाऊ शकतो, जास्तीत जास्त रोजगार कसे मिळतील यासाठी आपण प्रयत्नशील असून माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जे शक्य आहे ते सर्व करणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं. तर पुढच्या दहा वर्षात कोल्हापूर कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात कसे अग्रेसर राहील यासाठी प्रमुख्याने प्रयत्न केले जातील. कोल्हापूरची ओळख ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर होणे हा प्रमुख उद्देश हा ब्रँड कोल्हापूरचा आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा असं आवाहनही पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं.
यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूरला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण ब्रँड कोल्हापूर म्हणून गौरव करत आहोत,याला कोल्हापूरकरांनी साथ द्यावी असे आवाहन केले.
यावेळी अवनी संस्थेच्या अनुराधा भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. सी. डी. लोखंडे यांनी ब्रँड कोल्हापूर हा स्फुर्ती देणारा कार्यक्रम अनेकजण यासाठी पुढे येतील आणि ब्रँड कोल्हापूरला चालना देतील असं सांगितले.
या समारंभात कोल्हापूर ब्रँड म्हणून संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. सी. डी. लोखंडे, डॉ. पी. एस. पाटील, अवनी संस्थेच्या अनुराधा भोसले, अभिनेत्री उषा जाधव, शिल्पकार किशोर पुरेकर, सतीश सूर्यवंशी आणि सचिन सूर्यवंशी, रोहित कांबळे आणि राजेंद्र मोरे, प्रेम आवळे, गिर्यारोहक सागर नलवडे, ड्रोन मेकर अजिंक्य दीक्षित, अमित माळकरी, अनुप्रिया गावडे, लेफ्टनंट सार्थक धवन, सलीम मुल्ला यांच्यासह कला, क्रीडा आणि तसेच इतर क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा गौरव प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी ४९ खेळाडूंना ब्रँड कोल्हापूरने गौरविण्यात आले तर संशोधन, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील ४९ जणांचा असा एकूण ९८ जणांचा गौरव ब्रँड कोल्हापूर म्हणून करण्यात आला. यावेळी भूषण गगराणी यांच्या हस्ते ब्रँड कोल्हापूर कमिटी मेंबरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निमंत्रित मान्यवर खेळाडू मोठया संख्येने उपस्थित होते.