कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर उत्तर विधानसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री सतेज पाटील यांनी, सकाळचा नाष्टा नागरिकांसोबत करत चर्चा केली. गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, रंकाळा टॉवर आणि पाटाकडील तालीम मंडळ या ठिकाणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी भेट देत कटवड्याचा नाष्टा नागरिकांसोबत घेतला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज नागरिकांच्यासोबत सकाळचा नाष्टा घेतला. शनिवारी सकाळी आठ वाजता पालकमंत्री सतेज पाटील यांनी गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, रंकाळा टॉवर आणि पाटाकडील तालीम मंडळ परिसरात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांच्यासोबत झणझणीत कोल्हापुरी कटवडाचा नाष्टा करत चर्चा केली.
यावेळी बोलताना त्यांनी कोल्हापूर हे छत्रपती शाहूंची नगरी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणार हे शहर आहे. ताराराणीचा इतिहास शहराने देशाला दिला आहे. त्यामुळे या शहराची पहिली महिला आमदार म्हणून जयश्री चंद्रकांत जाधव यांना विजयी करण्याचे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून विरोधक आपल्यावर वैयक्तिक टिका-टिपणी करत आहेत. मात्र त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवावी असे आव्हानही त्यांनी केले. कोल्हापूर शहर दातृत्वाचे शहर आहे. संस्काराची शिकवण या शहराने दिली आहे. त्यामुळे पती गमवलेल्या एका भगिनीला आधाराची गरज असून, स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांच्या विकासाचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
नागरिकांच्यासोबत झालेल्या चर्चेवेळी, स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना मताधिक्याने विजयी करण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्र पक्षांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक , तरुण मंडळाचे कार्यकर्ते, स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते