२०२६ सालापर्यंत कोल्हापूर हे राज्यातील मोठे विकसित शहर असेल: पालकमंत्री

Spread the love

• व्हायब्रंट महाएक्स्पो २०२२ प्रदर्शनाचे शानदार उदघाटन
कोल्हापूर • प्रतिनिधी 
     २०२६ सालापर्यंत कोल्हापूर हे पुण्यानंतर राज्यातील सर्वात मोठे विकसित शहर असेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. व्हायब्रंट महाएक्स्पो २०२२ या शाहूपुरी जिमखाना मैदानावर आयोजित प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
      उद्योग क्षेत्राला चालना मिळावी व वेगवेगळ्या उद्योगांची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँन्ड इंडस्ट्री अँन्ड अँग्रीकल्चर व कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँन्ड इंडस्ट्रीज व एमआयडीसी महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य औद्योगिक आणि यंत्रसामग्री असणारे  “व्हायब्रंट महाएक्स्पो २०२२” प्रदर्शन १५ ते १८ एप्रिल या कालावधीत आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे आज फित कापून उदघाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने यांची तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी राहुल भिंगारे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, करुणाकर शेट्टी,महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेडणेकर, रिलायन्स इंडस्ट्रीज लि. पुणेचे सत्यजित भोसले, रामसा क्रेन्स प्रा. लि.चे सीईओ सदाशिव बरगे, महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष रवी बोराटकर यांची उपस्थिती होती.
       यावेळी पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले की, अर्थकारणाची चक्रे फिरत आहेत. नव्या टेक्नॉलॉजीची माहिती होण्यासाठी नवीन उद्योजकांना हे प्रदर्शन माध्यम आहे. कोल्हापूरमध्ये पूर्वी एमआयडीसीची संकल्पना नव्हती. उद्यम को -ऑप सोसायटी होती. याठिकाणी उद्योजकांना उभे केले गेले आता मात्र उद्योगधंदे वाढीला लागले आहेत. करवीर तालुक्यातील हलसवडे येथे एमआयडीसी करण्याचा विचार चालू आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये औद्योगिक प्रगती होणे आवश्यक आहे. केवळ शेती आणि दूध यावरच अर्थकारण चालते, त्यामुळे उद्योग क्षेत्राला चालना देणे गरजेचे आहे. कोल्हापूरला पुढे घेऊन जाण्याचा विचार चालू आहे त्यासाठी अनेक रस्त्यांचा प्लॅन तयार केलेला आहे. नाईट लँडिंग विमानतळावर करण्याची तयारी चालू आहे. कोल्हापूरमधील किचन वेअर कपड्यांचे मार्केट यांच्या विकासाला प्राधान्य दिले जाणार आहे. मेट्रोच्या माध्यमातून पुणे मुंबई पुढे येत आहे, यामुळे पश्चिम महाराष्ट्राला मूलभूत सुविधा कशा देता येतील यासाठी प्रयत्न चालू आहेत. देशात व राज्यात ३० जिल्हे एक्सपोर्टमध्ये समाविष्ट आहे, त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश सातव्या क्रमांकावर आहे. कनेक्टिविटीसाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. निधी कशा पद्धतीने कोल्हापूरकडे येता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे सांगून २०२६ सालापर्यंत कोल्हापूर कोकणसाठी व पश्चिम महाराष्ट्रसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. अनेक रस्ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.
       यावेळी खा. धैर्यशील माने, खा. संजय मंडलिक, रिलायन्स इंडस्ट्रीज लि. पुणेचे
सत्यजित भोसले, महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष रवी बोराडकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँन्ड इंडस्ट्री अँन्ड अँग्रीकलचरचे अध्यक्ष ललित गांधी,
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, रामसा क्रेन्स प्रा. लि.चे सीईओ सदाशिव बरगे यांनीही आपले विचार मांडले.
       यावेळी हाऊस ऑफ इव्हेंटचे सुजित चव्हाण यांना लातूर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाची इव्हेंटची जबाबदारी मिळाल्याने त्यांचा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन ताज मुलाणी यांनी केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे करुणाकर शेट्टी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!