‘सी-फोर्ट सर्किट टूरिझम्’ प्रकल्प शासकीय स्तरावर राबविला जावा: खा.संभाजीराजे छत्रपती

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     महाराष्ट्राला लाभलेले जलदुर्गांचे वैभव सागरी पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पोहोचावे, यासाठी ‘सी-फोर्ट सर्किट टूरिझम्’ प्रकल्प शासकीय स्तरावर राबविला जावा, याकरिता खासदार संभाजीराजे छत्रपती गेल्या चार वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. त्याकरिता सर्व स्तरांवर त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. याबाबत खासदार संभाजीराजे यांनी सोमवारी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या महासंचालिका व्ही. विद्यावती यांची भेट घेतली.
      या प्रकल्पाचा पहिला महत्त्वाचा टप्पा म्हणजे, सर्व जलदुर्गांना जेटी बांधणे. यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड व भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे माझा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. यामुळे नुकतीच सुवर्णदुर्ग व पद्मदुर्ग या किल्ल्यांना जेटीसाठी मंजूरी मिळाली असून, संपूर्ण आराखडा पर्यटन विभागाकडे पाठविण्यात आलेला आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाने यापूर्वीच तत्त्वतः मंजुरी दिलेली असून लवकरच यासाठी अंतिम मंजुरी दिली जाईल, असे विद्यावती यांनी यावेळी संभाजीराजे यांना सांगितले.
     मार्च २०२२ साली जेटी बांधण्याचे काम सुरू होऊन मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होईल. तसेच जंजिऱ्याच्या जेटीचे नूतनीकरण व खांदेरी, उंदेरीसह इतरही जलदुर्गांच्या जेटी उभारण्याची प्रक्रियादेखील लवकरच मार्गी लागेल, अशी माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डचे डायरेक्टर अमित सैनी यांनी दिल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.
      सुवर्णदुर्ग व पद्मदुर्ग हे किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले असून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व स्वराज्याच्या आरमारी इतिहासात या किल्ल्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्राला लाभलेले जलदुर्गांचे वैभव व त्यांचा गौरवशाली इतिहास जगभरात पोहोचण्यामध्ये ‘सी-फोर्ट सर्किट टूरिझम्’ प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जगभरातील पर्यटक यामुळे महाराष्ट्राकडे आकर्षित होतील. शिवाय, पर्यटनवृद्धीच्या माध्यमातून रोजगारही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील, असे प्रतिपादन यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले.
——————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!