कोल्हापूर • प्रतिनिधी
भारतातील ७ कोटी व्यापार्यांची शिखर संस्था म्हणून कार्यरत असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ( CAIT – कॅट) तर्फे संपूर्ण भारतीय ऑनलाईन व्यापार पोर्टल ‘भारत-ई-मार्केट’ च्या लोगोचे अनावरण केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री सोमप्रकाश यांच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती ‘कॅट’ चे राष्ट्रीय संगठन मंत्री ललित गांधी यांनी दिली.
लोगो अनावरणप्रसंगी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी.भरतीया, राष्ट्रीय चेअरमन महेंद्रभाई शहा, राष्ट्रीय महामंत्री प्रविण खंडेलवाल, सुखदीप बन्सल, एचडीएफसी बँकेचे कार्यकारी संचालक उत्तम अहलुवालीया, ऑल इंडिया ट्रान्सपोर्टचे प्रदिप सिंघल, ऑल इंडिया मोबाईल रीटेलर्स असो.चे अध्यक्ष अरविंद खुराणा, ऑल इंडिया कन्झ्युमर गुडस असो.चे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ऑनलाईन पॉर्टलमुळे भारतातील किरकोळ व्यापारी, स्थानिक दुकानदार, संकटात सापडले आहेत. तसेच या बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या पोर्टलवरून मोठ्या प्रमाणावर चिनी उत्पादने विक्री करीत आहेत.या तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन होत असलेल्या आक्रमणाला उत्तर देण्यासाठी कॉन्फेडरेशनने भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या सहकार्याने संपूर्णपणे भारतीय व्यापार्यांच्या मालकीचे ई-कॉमर्स पोर्टल ‘भारत-ई-मार्केट’ विकसित केले असून या पोर्टलवरून कोणतेही चीनी उत्पादन विक्री केले जाणार नाही अशी रचना केली गेली आहे. तसेच या पोर्टलमध्ये सहभागी होऊन ऑनलाईन व्यापारासाठी कोणतेही कमिशन द्यावे लागणार नाही. अशी माहिती राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल व राष्ट्रीय संगठन मंत्री ललित गांधी यांनी दिली.
केंद्रीय मंत्री सोमप्रकाश यांनी छोट्या व्यापार्यांच्या सुरक्षेसाठी व व्यापार वाढीसाठी सुरू केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून या उपक्रमामुळे पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेस बळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला.राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया व अन्य मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
‘कॅट’चे उपाध्यक्ष सत्यभुषण जैन यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी देशाच्या विविध राज्यांचे पदाधिकारी सभागृहात उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश समितिचे कार्यकारी चेअरमन राजेंद्र बाठीया आदी पदाधिकारी ई-प्लॅटफॉर्मवरून सहभागी झाले.