• जयसिंगपूरमध्ये बांधकाम कामगारांना मोफत जेवण वितरण
कोल्हापूर • प्रतिनिधी
बांधकाम कामगारांना दुपारचे व रात्रीचे मोफत भोजन ही महाविकास आघाडी सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. या जेवणाचा दर्जा ढासळला अथवा जेवण वेळेत न मिळाल्यास थेट मला फोन करा, असे आवाहन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी कामगारांना केले. बांधकाम व इतर कामगारांची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. ती करून मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
जयसिंगपूरमध्ये बांधकाम कामगारांच्या मोफत जेवण वितरण प्रारंभाच्या कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर होते.
आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, काबाडकष्ट करणाऱ्या कामगार वर्गाला पौष्टिक व दर्जेदार अन्न मिळावे, या भावनेतुन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही अभिनव योजना सुरू केली आहे. इमारत बांधकाम व इतर कामगार मंडळाच्या माध्यमातून कामगारांसह त्याच्या कुटुंबियांचही कोट – कल्याण करणाऱ्या योजना या मंडळामार्फत राबविल्या जात आहेत.
शेतमजुरांचेही कल्याणकारी मंडळ…..
मंत्री मुश्रीफ म्हणाले, जनतेने मला जी – जी संधी दिली, तिचे जनतेसाठी सोनं करण्यात मी यशस्वी झालो. शेतमजुरांसह रिक्षा, ट्रॅक्स, टेम्पो व ट्रक ड्रायव्हर यांचेही महामंडळ लवकरच स्थापन करणार आहोत.
व्यासपीठावर जिल्हाधिकारी राहुल रेखावार, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, प्रांताधिकारी विकास खरात, सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव, आयटकचे दिलीप पवार, आनंदा गुरव, भारतीय मजदूर संघाचे अभिजीत केकरे, मनसेचे संघटक राजू निकम, आर्किटेक्ट इंजिनीयर असोसिएनचे अध्यक्ष राजू देसाई, उपाध्यक्ष रवींद्र चौगुले, नितीन पाटील, मिश्रीलाल जाजू, शामराव कुलकर्णी, आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी कामगार नेते रघुनाथ देशिंगे यांचेही भाषण झाले. स्वागत इंजिनीयर नितीन पाटील यांनी केले. प्रास्ताविकात पुण्याचे अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी बांधकाम कामगार मंडळाच्या योजनांची व कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली. आभार सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी मानले.