कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचे हक्क अबाधित राहण्यासाठी काळजी घ्यावी: जिल्हाधिकारी


कोल्हापूर • (जिमाका)
     जिल्ह्यात कोरोनामुळे ० ते १८ वयोगटातील ४३७ बालकांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एक पालक गमावलेली ४३० तर दोन्ही पालक गमावलेली ७ बालके आहेत. या बालकांना महिला व बालविकास विभागाकडून शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच या बालकांचे हक्क अबाधित राहण्यासाठी दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.
     कोविड-१९ च्या अनुषंगाने बालकांची काळजी व संरक्षणाच्या दृ‍ष्टीने गठीत केलेल्या जिल्हा कृती दल समिती (टास्क फोर्स) ची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी महानगरपालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुजाता शिंदे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा वैशाली बुटाले, सीपीआरच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षला वेदक तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते.
      जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, आरोग्य विभागाने जिल्ह्यात कोरोनामुळे उपचाराकरिता दाखल होणाऱ्या पालकांकडून ‘बालकांच्या पालकत्वाची जबाबदारी कोणाकडे सोपवायची, याबाबतच्या नोंदी घेऊन याची माहिती तसेच कोरोनामुळे पालक गमावलेल्या ग्रामीण भागातील व महानगरपालिका क्षेत्रातील बालकांची माहिती जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडे सादर करावी. या बालकांना महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने पुढाकार घेऊन टास्क फोर्सच्या पुढील बैठकीत परिपूर्ण माहिती सादर करावी. 
     नातेवाईकांकडे राहणाऱ्या अनाथ बालकांना दरमहा प्रत्यक्ष भेट देऊन ही बालके नातेवाईकांकडे सुरक्षित असल्याची खात्री करावी. तसेच या सर्व बालकांच्या वयोगटानुसार आवश्यक डोस व लसीकरण झाल्याच्या नोंदी घ्याव्यात. कोरोनामुळे पतीचा मृत्यू झालेल्या विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी अशा विधवा महिलांची तालुका निहाय यादी सादर करण्याची सूचना त्यांनी दिली. बालकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी १०९८ या ‘चाईल्डलाईन’ (हेल्पलाईन)ची व्यापक प्रसिद्धी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केल्या.
     महिला व बाल विकास अधिकारी सुजाता शिंदे यांनी जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित झालेल्या बालकांना बाल संगोपन योजना व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही महिला व बाल विकास विभागाकडून सुरू असल्याचे सांगितले.
——————————————————- Attachments areaReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *