संस्थाचालक आणि पालकांमध्ये समन्वय साधून शाळाप्रवेश पार पाडा : राजेश क्षीरसागर


कोल्हापूर • प्रतिनिधी
     गेल्या दोन वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळे संपुर्ण जग ठप्प झाले आहे. पालकांना पाल्याची फी कशी भरायची तर संस्थाचालकांना संस्था कशी चालवायची हे प्रश्न साहजिकच पडले आहेत. परंतु सर्वांना शिक्षण मिळणे हा विद्यार्थ्यांचा हक्क असून, यापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची जबाबदारी प्रशासनाएवढीच संस्थेचीदेखील आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या या दोन वर्षाच्या काळात संस्थाचालक आणि पालकांमध्ये समन्वय साधून यावर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, अशी सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली.
      गेल्या आठवड्यात शिक्षण उपसंचालक कार्यालयात पार पडलेल्या बैठकीच्या अनुषंगाने शालेय फी व प्रवेश प्रक्रिया संदर्भात प्रशासन आणि संस्थाचालकांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज बैठक पार पडली.
बैठकीच्या सुरवातीस युवा सेनेचे शहरप्रमुख चेतन शिंदे यांनी, शिक्षण उपसंचालक कार्यालयात चर्चा झालेल्या मुद्द्यांचा आढावा घेतला.
     यानंतर सूचना देताना राजेश क्षीरसागर यांनी, संस्थाचालकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार शालेय फीमध्ये पालकांना सवलत देण्याची भूमिका घ्यावी. गोरगरीब असणाऱ्या विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत द्यावी. तसेच त्यांना सुलभ हप्त्यांमध्ये फी जमा करता येईल, अशी प्रक्रिया राबवावी. सक्षम असलेल्या पालकांनीही संस्थेतील कार्यरत शिक्षक, कर्मचारी वर्गाचा विचार करून फीची अडवणूक करू नये. पीटीए समितीमध्ये शासनाचा सदस्य नेमण्याकरिता राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जात असून, पीटीए समिती नेमताना सर्वच पालकांना विश्वासात घेवून सर्वानुमते सदस्यांची नियुकीत करून समितीचा कारभार पारदर्शी ठेवावा. कोणत्याही विद्यार्थ्यास दाखला आवश्यक असल्यास त्याच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून फी अभावी दाखला अडवून ठेवू नये. अशा सूचना करीत यावर्षीची प्रवेश प्रक्रिया विना गोंधळ पार पाडण्यासाठी पालक आणि संस्थाचालक यांच्या समन्वय साधण्याच्या सूचना प्रशासनास केल्या. तर फी अभावी कोणाचा प्रवेश थांबवू नये, अशा सूचना संस्थाचालकांना केल्या. यासह संस्था चालकांसमोरही शिक्षकांचा, कर्मचाऱ्याचे वेतन आदी प्रश्न असून गोरगरीब पालकांची परिस्थिती समजून घेण्यासारखी आहे, पण खरोखरच सक्षम असणाऱ्या पालकांनी फी न तटवता शिक्षण संस्थेस मदत करावी, असे आवाहनही त्यांनी या बैठकीच्या माध्यमातून केले.
      यानंतर निवडक संस्थाचालकांनी आपली भूमिका स्पष्ट करीत यावर्षीची प्रवेश प्रक्रिया विनातक्रार पार पाडण्याची ग्वाही देत आपल्या समस्याही मांडल्या.  
     यानंतर बोलताना शिक्षण उपसंचालक एस. डी. सोनवणे यांनी, कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही. प्रवेश प्रक्रिया सुरळीत पाडण्यासाठी पुन्हा संस्था चालकांना लेखी निर्देश देवू. पीटीए समितीवर प्रशासनाचे लक्ष असेल. संस्था चालकांनी अन्यायी फी वाढ करू नये, असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *