• वृत्तपत्रांचे स्थान अबाधित: डॉ.संभाजी खराट
कोल्हापूर • (जिमाका)
विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जिल्हा माहिती कार्यालयात गुरुवारी (दि.६) ‘मराठी पत्रकार दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला उपसंचालक डॉ. खराट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माहिती अधिकारी वृषाली पाटील, सहायक संचालक फारुक बागवान, माहिती सहायक एकनाथ पवार तसेच कर्मचारी उपस्थित होते.
लोकप्रबोधनाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचं काम प्रसारमाध्यमे करतात. कोणतीही माध्यमे आली तरीदेखील वृत्तपत्रांचे स्थान अबाधित आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांनी केले. विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जिल्हा माहिती कार्यालयात ‘मराठी पत्रकार दिन’ साजरा करण्यात आला, याप्रसंगी त्यांनी मनोगत व्यक्त केले.
उपसंचालक डॉ. संभाजी खराट म्हणाले, समाजात घडणाऱ्या घटना, घडामोडींचं प्रतिबिंब वृत्तपत्रांत उमटतं. समाजाला ज्ञान देऊन लोकांना शिक्षित करण्याचं काम वृत्तपत्रांनी केलं आहे. समाजात बदल घडवण्याची मोठी ताकद वृत्तपत्रांमध्ये आहे. याचे श्रेय दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना आहे. लोकशिक्षणाचं, समाजप्रबोधनाचं काम दर्पण या वृत्तपत्राच्या माध्यमातून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केले. वयाच्या अवघ्या ३४ वर्षांच्या काळात पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक परिवर्तनाचं काम केल्याचे सांगून कोणतीही माध्यमे आली तरीही दिवसाची सुरुवात आपण वृत्तपत्र वाचून करतो, त्यामुळे वृत्तपत्रांचे महत्त्व आजही टिकून आहे, असे डॉ. खराट यांनी सांगितले.
माहिती अधिकारी वृषाली पाटील म्हणाल्या, जवळपास १८३ वर्षांपूर्वी ६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरु केलं. पारतंत्र्याच्या काळात वृत्तपत्राच्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्याचं काम आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केलं. वृत्तपत्रातून त्यांनी शिक्षण आणि समाजप्रबोधनाचे कार्य केले.
यावेळी सहायक संचालक फारूक बागवान, माहिती सहायक एकनाथ पोवार, छायाचित्रकार रोहित कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.