कोल्हापूर • प्रतिनिधी
उत्तरप्रदेशमधील कानपूर येथे असलेल्या छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठामध्ये महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास संभाजीराजे छत्रपती हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यादेखील व्हीसीच्या माध्यमातून या कार्यक्रमास उपस्थित होत्या.
राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचे स्मृतीशताब्दी वर्ष व जयंतीनिमित्त विद्यापीठाने पूर्वसंध्येला विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वंचित व शोषित घटकांना न्याय देण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या कार्याची महती सांगणारे नाट्यदेखील यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केले. तसेच, महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमासप्रसंगी संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाहास संमती देणारा कायदा केला होता. हा विचार पुढे नेण्यासाठी विधवांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था व्हावी, याकरिता संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्याकडून १० लाख रुपयांची देणगी विद्यापीठास जाहीर केली. याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू विनय पाठक यांनी संभाजीराजे यांचे आभार मानले.
यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, १९१९ साली कानपूर येथील कुर्मी समाजाने छत्रपती शाहू महाराजांना “राजर्षी” ही पदवी दिली होती. त्याच शहरातील महाराजांच्या नावे असलेल्या विद्यापीठात त्यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित राहणे, माझ्यासाठी आनंददायी आहे.
ते म्हणाले की, “आरोह तमसो ज्योती” हे विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ होतो अंध:कारातून प्रकाशाच्या दिशेने उत्कर्ष करा. छत्रपती शाहू महाराजांनी देखील समाजाला अज्ञानाच्या अंध:कारातून शिक्षणाच्या माध्यमातून उत्कर्षाच्या प्रगतीपथावर पोहोचविले. शिक्षणानेच समाज व राष्ट्र प्रगतीपथावर पोहोचते, असे सांगत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.