कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) चे संस्थापक व शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांची ८४ वी जयंती कार्यक्रम संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे चेअरमन विश्वास पाटील, संचालक व अधिकारी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना संघाचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले की, गोकुळ दूध संघाच्या उभारणी व वाटचालीत स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांचे फार मोलाचे योगदान आहे. १९६३ साली ७०० लिटर दूध संकलन सुरु झालेले गोकुळ दूध संघाचे आज १६ लाख लिटर दूध संकलन पार केले असून या सर्व गोकुळच्या प्रगतीमध्ये स्वर्गीय चुयेकर यांचे योगदान कदापि विसरता येणार नाही. त्यांची दूध उत्पादक शेतकऱ्यांप्रती असणारी तळमळ ही आम्हाला वाखाणण्याजोगी होती. त्यांनी घेतलेल्या अनेक धाडसी निर्णयामुळे आज गोकुळ यशोशिखरावर पोहचलेले आहे.
यावेळी स्वर्गीय चुयेकर यांना अभिवादन करून संघाचे संचालक शशिकांत पाटील – चुयेकर,अजित नरके, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके यांनी मनोगते व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.पी.पाटील यांनी केले तर आभार संचालक बाबासाहेब चौगले यांनी मानले.
याप्रसंगी गोकूळचे संचालक अभिजित तायशेटे, प्रशासन व्यवस्थापक डी.के. पाटील, पशुसंवर्धन व्यवस्थापक यु.व्ही. मोगले, संघाचे आजी-माजी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.