केंद्र सरकारने म्युकर मायकॉसिस औषधांचा पुरवठा सुरळीत करावा

• ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोरोना महामारीत ऑक्सिजन व रेमडीसीवर औषधाचे नियंत्रण केंद्र सरकारने स्वतःकडे घेतले आहे. त्याप्रमाणे म्युकर मायकॉसिसच्या औषधाचेही नियंत्रण केंद्र सरकारने हातात घेतले आहे. या औषधांचा पुरवठा केंद्राने सुरळीत करावा, अशी आग्रही मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. कागलमध्ये कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.
     मंत्री श्री. मुश्रीफ मुढे म्हणाले, करंबळी (ता.गडहिंग्लज) येथील कार्यकर्ते संजय माळी म्युकर मायकोसिसने आजारी आहेत. त्यांची पत्नी त्यावरील इंजेक्शनसाठी रोज टाहो फोडत आहे. हे चित्र केंद्र सरकारने बदलावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्समधून विद्यार्थ्यांना आयपीएल बघणार की जपान ऑलम्पिक बघणार ? असे प्रश्न विचारत आहेत. आधी सगळ्यांना लसीकरण देऊन जगवा, आणि मग ठरवू  ऑलिम्पिक बघायचं की आयपीएल…,असा मार्मिक टोलाही त्यांनी लगावला. संबंध देश लसीकरणासाठी तडफडत असताना पंतप्रधान देशाच्या जनतेला विश्वासात का घेत नाहीत? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.
     सीपीआरसह इचलकरंजी, कागल, सेनापती कापशी, गडहिंग्लज, उत्तुर, मुरगुड, मुदाळ, शेंडूरसह छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कोविड केंद्रालाही तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठविणार असल्याचे ते म्हणाले.
     यावेळी तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कागल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता पाटील, कागलचे मुख्याधिकारी पंडित पाटील, मुरगूडचे मुख्याधिकारी हेमंत निकम, कागल कोविड केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित शिंदे यांनी आपापल्या विभागाचा सविस्तर आढावा दिला.
     बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. डी. सोनावणे, पीडब्ल्यूडीचे उपअभियंता डी. व्ही. शिंदे, कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुरगूडचे पोलीस उपनिरीक्षक विकास बडवे, गटशिक्षण अधिकारी डॉ. जी. बी.  कमळकर, सहाय्यक गटविकास अधिकारी आप्पासाहेब माळी, कागलचे नगर अभियंता सुनील माळी, यांच्यासह केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, प्रकाश गाडेकर, प्रवीण काळबर, सौरभ पाटील, संजय ठाणेकर आदी प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *