शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे जन्मशताब्दी महोत्सव शुक्रवारी सांगता समारंभ

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
       शिक्षणाची गंगा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून बहुजन समाजाला शिक्षण प्रवाहात आणणारे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक, संस्थापक आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे २०१८-१९ हे जन्मशताब्दी वर्ष संस्थेच्या ४०७ संस्कार केंद्रामध्ये मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात आले. कोरोना महामारीच्या संकटामुळे जन्मशताब्दी महोत्सवाचा सांगता समारंभ होऊ शकला नाही. त्यामुळे हा सांगता समारंभ शुक्रवारी (दि.२९) सकाळी १०:३० वाजता विवेकानंद महाविद्यालयाच्या प्रांगणात होत असल्याची माहिती प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कौस्तुभ गावडे, अशोक पाटील उपस्थित होते.
       या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कणेरी मठाचे अदृश्य काडसिध्देश्वर महाराज हे असून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज अध्यक्ष म्हणून तर संस्थेचे पेट्रन खासदार श्रीमंत संभाजीराजे छत्रपती, संस्थेचे अध्यक्ष आम. चंद्रकांतदादा पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सेक्रेटरी व प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सहसचिव (प्रशासन) प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ, संस्थेचे सहसचिव (अर्थ) एस. एम. गवळी, संस्थेचे आजी – माजी पदाधिकारी व संस्थेच्या १३ जिल्हयातील ४०७ शाखांमधून बहुसंख्य गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
      कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन, संस्था प्रार्थना व शाहीर आझाद नायकवडी यांच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जीवनावर आधारित पोवाड्याने होईल. याप्रसंगी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे जन्मशताब्दी महोत्सव स्मरणिका, सौ.अर्चना पानारी यांचा परिसस्पर्श, प्रा. डॉ. विनोदकुमार वायचळ यांनी हिंदीत अनुवादित केलेला शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे (व्यक्तित्व एवं कार्य) आणि प्रा.डॉ. मच्छिंद्र नांगरे यांचा डॉ.बापूजी साळुंखे आणि मराठवाडा या ग्रंथांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
      या कार्यक्रमासाठी शिक्षणप्रेमी, अभ्यासक, विचारवंत यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्था कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!