अतिवृष्टीच्या काळात जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी: राजेश क्षीरसागर

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      भारतीय हवामान वेधशाळेने दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार सावधानतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. २१ व २२ जुलै रोजी अतिमुसळधार पावसाची तर २३ व २४ जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या अतिवृष्टीच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.
      ते पुढे म्हणाले, सन २०१९ च्या भयाण महापुराची भीषणता कोल्हापूरवासीयांनी अनुभवली आहे. त्या आठवणी आजही ताज्या असताना कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. खासकरून कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा, राधानगरी, शाहुवाडी, पन्हाळा, गगनबावडा, भुदरगड तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अंदाजित पाऊसमानानुसार नदी व नाल्यांच्या पात्रातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने शहरातील पूर बाधित क्षेत्रासह जिल्ह्यातील नदी काठावरील गावांतील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी. संभाव्य पूरस्थितीची जाणीव झाल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. या अतिवृष्टीच्या काळात जिल्ह्यातील नागरिकांनी संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, मोबाईलचा वापर टाळावा. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. अतिवृष्टी कालावधीत झाडे पडणे, घर किंवा इमारत कोसळणे, पूर येणे, दरडी कोसळणे अशा आपत्ती घडण्याची शक्यता असते. अशावेळी नागरिकांनी सतर्क रहावे. आपतकालीन स्थिती उद्भवण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी आपण रहात असल्यास प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे. पूरप्रवण क्षेत्र व पाणी तुंबण्याची ठिकाणे या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत उद्भवल्यास त्याबाबत जागरूक रहावे व योग्य ती दक्षता घेण्यात यावी. जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, पूल इत्यादी  ठिकाणी जाऊ नये. अतिवृष्टी होत असताना कोणीही नदी, नाले, तलाव, धबधबा आदी ठिकाणी जाऊ नये.
     अतिवृष्टी कालावधीत रस्ते निसरडे बनल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी वाहन चालवताना आवश्यकती काळजी घेण्यात यावी. पूरस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी पूरस्थिती पाहण्यासाठी गर्दी करू नये, असेही आवाहन राजेश क्षीरसागर यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!