कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर महानगरपालिका आणि राजाराम बंधारा ग्रुपच्यावतीने गुरूवारी कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथील पंचगंगा नदी घाटाची स्वच्छता करण्यात आली.
घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीमध्ये निर्माल्य टाकू नये, असे आवाहन महानगरपालिका आणि राजाराम बंधारा ग्रुपच्यावतीने नागरिकांना करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांनी घटस्थापनेचे घट पंचगंगा नदी घाटाच्या एका बाजूला लावले होते. नागरिकांच्या या प्रतिसादाबद्दल महापालिका आरोग्य विभागाने नागरिकांना धन्यवाद दिले आहेत.
महानगरपालिका आणि राजाराम बंधारा ग्रुपच्यावतीने गुरूवारी राजाराम बंधारा येथील पंचगंगा नदी घाट स्वच्छ करुन चकाचक केला. यापुढेही हा घाट स्वच्छ, सुंदर आणि नेटका ठेवण्याबरोबरच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, वारंवार साबनाने हात धुणे, रस्त्यावर न थुंकने आणि कोरोनाची लक्षणे दिसताच तपासणी करून घेण्याचे आवाहनही महापालिका आरोग्य विभागाने केले.