कोल्हापूर • (जिमाका)
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘रिव्हर्स ऑफ इंडीया’ या उपक्रमाचे देशभर आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाने १५ ते २५ डिसेंबर २०२१ या कालावधीत सेलीब्रिटींग रिव्हर्स ऑफ इंडिया या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
जिल्हयातील पंचगंगा नदीची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत प्रयाग चिखली येथे जिल्हा परिषदमार्फत नदी घाट परिसर स्वच्छतेच्या उपक्रमातून करण्यात आला.
उपस्थित सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेवून स्वच्छतेसाठी श्रमदान केले. स्वच्छतेच्या कामामध्ये सर्व मनापासून सहभागी झाल्यास पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी व्यक्त केले.
यावेळी शिक्षण व अर्थ समिती सभापती रसिका पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी व्ही. टी. पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) अरूण जाधव, जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, गटविकास अधिकारी जयवंत उगले तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, शिक्षक, तरूण मंडळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
नदी उत्सव उपक्रमांतर्गत जिल्हयातील पन्हाळा, शाहूवाडी, करवीर, राधानगरी, हातकणंगले, शिरोळ या तालुक्यातील पंचगंगा नदीकाठच्या सर्व गावांमध्ये स्वच्छता करण्याबाबत सूचना दिल्या असून, या गावांमध्ये स्वच्छता व जनजागृतीपर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.