हवामानातील बदल सर्वस्वी सूर्यावरच अवलंबून: डॉ.राजमल जैन कोठारी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      हवामानातील कोणताही होणारा बदल हा सर्वस्वी सूर्यावरच अवलंबून असतो. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधील असणाऱ्या वातावरणातील विविध थरावर सूर्याचा परिणाम दिसून येतो. वातावरणामध्ये अचानक होणाऱ्या या बदलांचे रूपांतर नैसर्गिक आपत्तीमध्ये होते. यासोबतच मानवाने केलेले प्रदूषण, अतिक्रमणसुद्धा नैसर्गिक आपत्तीस कारणीभूत आहे. म्हणून नैसर्गिक आपत्ती टाळायची असेल तर आपणास सूर्याच्या हालचालींचा सखोल अभ्यास करून पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज आहे, असे ठाम प्रतिपादन इस्रोचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ डॉ.राजमल जैन कोठारी यांनी केले.
       येथील भारती विद्यापीठाचे डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग व भौतिक शास्त्र विभाग यांच्यावतीने आयोजित केलेल्या व्याख्यानप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
      ते म्हणाले की, मानवाने आपल्या स्वार्थासाठी बेसुमार वृक्षतोड, पशुहत्या केल्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे भूकंप, दुष्काळ, त्सुनामी, महापूर अशा अनेक नैसर्गिक आपत्तींचा आपणाला सामना करावा लागत आहे. यातून आपली सुटका करायची असेल तर आपण निसर्गाचा समतोल राखला पाहिजे.
       महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.डी.जी.कणसे आपल्या संदेशात म्हणाले की, निसर्गाला वाचवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. ती आपण योग्य रितीने पार पाडली पाहिजे आणि निसर्गाचे संवर्धन केले पाहिजे .
     याप्रसंगी कला व वाणिज्य विभागप्रमुख टी. आर. सावंत, अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग समन्वयक डॉ. ए.आर. सुपले, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी.पी.नाडे, प्रा. वाय. सी. धुळगंड, प्रा. एन. एन. नाटके तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
——————————————

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!