विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही महाविद्यालयांची जबाबदारी: कुलगुरू डॉ. शिर्के


कोल्हापूर • प्रतिनिधी
      विद्यार्थी आणि विद्यार्थींनींच्या कला गुणांना वाव देण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची प्राथमिक जबाबदारी ही प्रत्येक महाविद्यालयांची असते, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांनी केले.
     शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद हॉलमध्ये ऑनलाईन पध्दतीने आयोजित कराड येथील यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स आणि वेणूताई चव्हाण कॉलेज यांच्या अनुक्रमे ”यशवंत” आणि ”संगम” या नियतकालिकांचे प्रकाशन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते.
     कुलगुरू डॉ. शिर्के पुढे म्हणाले, महाविद्यालयीन नियतकालिक म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थींनींना आपले विचार व्यक्त करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते.  विद्यापीठ क्षेत्रामध्ये २७६ महाविद्यालये आहेत. सर्वच महाविद्यालये याकडे गंभीरतेने पाहतात असे नाही.  महाविद्यालयांनी नियतकालिकांचे प्रकाशन न करणे म्हणजे त्यांच्या विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध न करून देण्यासारखे आहे. विद्यार्थ्यांनी काढलेले चित्र, लेख, त्यांच्या कल्पना, वैज्ञानिक दृष्टीकोन हे नियतकालिकांमध्ये प्रसिध्द झाल्यानंतर त्यांना जो आनंद होतो तो शब्दांमध्ये मांडता येत नाही.
प्रत्येकवर्षी घेतल्या जाणाऱ्या नियतकालिकांच्या स्पर्धांमध्ये नियतकालिका चांगल्यात चांगले कसे होतील या गोष्टी स्पर्धा पध्दतीने विचारात घेतल्या जातात.  सर्वच महाविद्यालये या गोष्टी स्पर्धेच्या दृष्टीने पाहतात. तो उत्कृष्ट कसा होईल यावर संपादकमंडळींचा कटाक्ष असतो. 
     ”संगम” या नियतकालिकेच्या  मुखपृष्ठावर भारत देश जगाला कोरोना प्रतिबंधक लस व्हॅक्सीन देण्यासाठी आत्मनिर्भर झाला आहे हे दाखविले आहे.  ”यशवंत” या नियतकालिकेच्या मुखपृष्ठावर संपूर्ण जगाला कोव्हीडने बांधून टाकलेले आहे आणि हे जोखड काढून टाकण्याची चावी भारत देशाकडे आहे, हे गौरवास्पद आहे. 
”यशवंत” या नियतकालिकेचे संपादन डॉ.ए.व्ही.माळी तर ”संगम” या नियतकालिकेचे संपादन डॉ.महेंद्र कदमपाटील यांनी केले.
     वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडचे प्राचार्य डॉ.एल.जी.जाधव यांनी प्रास्ताविक केले. यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराडचे प्राचार्य डॉ.एस.बी.केंगार यांनी आभार मानलेे. ऑनलाईन पध्दतीने झालेल्या या वार्षिक नियतकालिका प्रकाशनामध्ये कराड येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश पाटील, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गोफणे  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *