कोल्हापूर • (जिमाका)
दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी कार्ड) देण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १०० दिवसांची विशेष मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र मिळवून देण्याचे काम गतीने पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.
वैश्विक ओळखपत्राच्या अंमलबजावणी बाबत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, सीपीआरचे प्रभारी अधिष्ठाता सुधीर सरवदे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिल्पा पाटील यांच्यासह समिती सदस्य प्रत्यक्ष तर तालुकास्तरीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, दिव्यांग व्यक्तींना वेळेत प्रमाणपत्र व ओळखपत्र सहजपणे मिळवून देणे आवश्यक आहे. यूडीआयडी संगणकीय यंत्रणेचे सक्षमीकरण करून दिव्यांग व्यक्तींना विहित मुदतीत दिव्यांग प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात ही विशेष मोहीम प्रभावीपणे राबवावी. यासाठी तालुकास्तरावरील विशेष तज्ञ डॉक्टरांची सीपीआर रुग्णालयात आठवड्यातून एकेक दिवस नियुक्ती करून दिव्यांगांना लवकरात लवकर प्रमाणपत्र वितरित करावे. यासाठी सीपीआरला तांत्रिक सहाय्य होण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक संगणक प्रणाली व डाटा एन्ट्री ऑपरेटर उपलब्ध करून देण्यात येतील, असे सांगून दिव्यांगांच्या यूडीआयडी ओळखपत्रांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना त्यांनी सीपीआर व जिल्हा समाज कल्याण कार्यालयाला केल्या.
——————————————————- Attachments area