शेतकरीविरोधी काळा कायदा व इंधन दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध


कोल्हापूर • प्रतिनिधी
      केंद्र सरकारने पारित केलेल्या काळ्या कृषी कायद्यांच्या विरोधात आणि अन्यायकारक इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व पालकमंत्री सतेज पाटील आणि पक्ष निरीक्षक शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटी येथे एकदिवसीय उपोषण करण्यात आले. या आंदोलनात आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी होऊन या शेतकरी विरोधी काळ्या कायद्यांचा आणि इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला.
     केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे आणि अन्यायकारक इंधन दरवाढीच्या विरोधात शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली. या बंदला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला. काँग्रेसतर्फे संपूर्ण जिल्ह्यात एकदिवसीय उपोषण करण्यात आले. काँग्रेचे जिल्हाध्यक्ष व पालकमंत्री सतेज पाटील, पक्ष निरीक्षक शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटी येथे एकदिवसीय उपोषण करण्यात आले. या उपोषणात आमदार प्रा. जयंत आसगावकर, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे आणल्याने या कायद्यांना देशातील शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. हे कायदे केंद्र सरकारने तात्काळ रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर मागील ११० दिवसांपासून शेतकरी ठाण मांडून बसलेले आहेत. परंतु हे कृषी कायदे केंद्र सरकारने रद्द केले नाहीत. तसेच पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसवर भरमसाठ कर लावून केंद्र सरकार जनतेच्या खिशावर दरोडा टाकत आहे. पेट्रोल १०० रुपये लिटर तर गॅस सिलिंडर ८५० रुपये झाला आहे. महागाईने लोकांचे जगणे कठीण झाले आहे. कामगार कायद्यांतील बदलांमुळे कामगार देशोधडीला लागणार आहेत. तर सातत्याने दरवाढ होत असलेल्या गॅस दरवाढीच्या विरोधात  प्रतिकात्मक गॅस सिलिंडरचे प्रदर्शन करून या दरवाढीचा निषेध नोंदवला. केंद्र सरकारच्या या मनमानी हुकुमशाहीला विरोध करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून हे उपोषण करण्यात आले.
      या आंदोलनाला काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांना जिल्हा काँग्रेस कमिटीने उपस्थित राहण्याबाबत निरोप देऊनही ते उपस्थित न राहिल्याने त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा होती.  आंदोलनात गुलाबराव घोरपडे, ॲड. सुरेश कुऱ्हाडे, दिलीप पाटील, मोहन सालपे, तौफिक मुल्लाणी, सचिन चव्हाण, संजय मोहिते, बाळासाहेब सरनाईक, संध्या घोटणे,  सुलोचना नायकवडे, चंदा बेलेकर, करवीर पंचायत समिती सभापती मीनाक्षी पाटील, सुभाष बुचडे, अर्जुन माने यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
     देशातील भाजपची सत्ता ही सर्वसामान्यांच्या विरोधातील आहे. सामान्य मध्यमवर्गीय माणसाला महागाईचा फटका बसत आहे. भाजप सरकारने सामान्यांचे प्रतिनिधीत्व करतो म्हणून देशात सत्ता घेतली मात्र खऱ्या अर्थाने उद्योगपतींचे भले करून सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांना खड्डयात घालण्याचे काम केले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे केंद्रातील भाजप सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *