तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन वैद्यकीय सेवा-सुविधा गतीने निर्माण करा: जिल्हाधिकारी


कोल्हापू • (जिमाका)
     कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यात आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा- सुविधा गतीने निर्माण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
     जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती नियंत्रणाबाबत विविध विभाग प्रमुखांसोबत बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस.मोरे, जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. उषा कुंभार तसेच संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
     जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले,
जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी ऑक्सिजन निर्मिती व साठवणूकीची क्षमता वाढवावी तसेच ऑक्सिजन पुनर्भरणाची ठिकाणे वाढवण्यात यावीत. ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टची कामे तात्काळ पूर्ण करावीत. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर युक्त बेडची संख्या वाढवावी, असे सांगून ते म्हणाले, ग्रामीण भागातील रुग्णांना तात्काळ उपचार मिळवून देण्यासाठी ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधा वाढवाव्यात.
     रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांचे ऑडिट करणाऱ्या पथकांनी बिलांची काटेकोर तपासणी करुन रोजच्या रोज अहवाल सादर करावा. जादा बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.
     शहर व ग्रामीण भागातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये विद्युत पुरवठा व विद्युत मशिनरी सुरळीतपणे सुरु राहण्यासाठी पूर्ण क्षमतेचे जनरेटर बसवावेत, यासाठी आवश्यक ती कार्यवाही गतीने करा.  स्त्राव तपासणीचे अहवाल वेळेत मिळण्यासाठी शासकीय प्रयोगशाळेमध्ये पूर्ण क्षमतेने तपासण्या होणे गरजेचे आहे, यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ व यंत्रसामुग्री उपलब्ध करुन देण्यात येईल, असे त्यांनी सांगून कोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्यात वैद्यकीय सेवा -सुविधा गतीने निर्माण होण्यासाठी आवश्यक त्या प्रशासकीय मान्यता तात्काळ घेऊन कामे गतीने मार्गी लावावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी यंत्रणेला दिले.
     सद्यस्थितीत असणारे आयसीयू बेड, उपलब्ध व्हेंटिलेटर, ऑक्सिजन प्लॅन्ट, जनरेटर सुविधा, ऑनलाइन माहिती भरण्याची वेळेत कार्यवाही करणे, स्त्राव तपासणी क्षमता, बिलांचे ऑडिट, मृत्यू ऑडिट (डेथ ऑडिट) वर अधिक लक्ष देणे, रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी उपाययोजना, रुग्णवाहिका, लसीकरण आदी विषयांचा आढावा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतला.
उपस्थित अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागांशी संबंधित कामाच्या सद्यस्थितीची माहिती  दिली.
——————————————————- Attachments areaReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *