भाविकांची वाढणारी संख्या लक्षात घेवून प्रशासनाने यात्रा नियोजन करावे:पालकमंत्री

Spread the love


कोल्हापूर • (जिमाका) 
       गेली दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. यंदाच्यावर्षी या प्रादुर्भावात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे प्रती वर्षाच्या तुलनेत यंदा अधिकचे ३० टक्के भाविक जोतिबा यात्रेसाठी येण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेवून प्रशासनाने सुयोग्य नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.
     मौजे वाडीरत्नागिरी येथील केदारलिंग (जोतिबा) देवस्थानची यात्रा १६ एप्रिल रोजी आहे. या यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर पन्हाळा प्रांताधिकारी अमित माळी, पन्हाळा तहसिलदार रमेश शेंडगे, वाडी रत्नागिरीच्या सरपंच राधा बुणे, उपसरपंच शिवाजी सांगळे आदी उपस्थित होते.
    यंदा यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येतील. या यात्रेसाठी भाविकांकरीता कोणतेही निर्बंध नसतील. असे स्पष्ट करुन त्यांची गैरसोय होता कामा नये. यात्रेदरम्यान रस्त्यावर असणारी अतिक्रमणे काढण्यात यावीत. यात्रेसाठी कार्यरत असणारे मंदीर व्यवस्थापन, स्टॉलधारक, संबंधित कर्मचारी, ठेकेदार या सर्वांच्या लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असावेत, याची आरोग्य विभागाने खात्री करावी. त्याचबरोबर या यात्रेस खाद्य पदार्थांचे स्टॉल लावणाऱ्या स्टॉलधारकांनी अन्न औषध प्रशासन विभागाची परवानगी घ्यावी असे सांगून, यात्रेदरम्यान भाविकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी पालकमंत्र्यांनी एसटी, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, एमएसईबी, अन्न औषध प्रशासन विभागासह इतर विभागाचा आढावा घेतला.
     तत्पूर्वी प्रांताधिकारी अमित माळी यांनी यात्रेच्या अनुषंगाने प्रशासनाकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या सुविधांची माहिती पालकमंत्र्यांना दिली तर देवस्थान समितीकडून भाविकांसाठी करण्यात येणाऱ्या सोयी सुविधाबाबतची माहिती देवस्थान समितीचे प्रभारी उप अभियंता सुयश पाटील यांनी आढावा बैठकीत दिली.
       पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाविकांसाठी उभारण्यात येणाऱ्या सभा मंडपाची तसेच भाविकांसाठी मंदिरात येण्या-जाण्याच्या मार्गाची पाहणी करुन आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीच्या सूचना संबंधितांना केल्या. तसेच गत पावसाळ्यात खचलेल्या रस्त्याची पाहणीही यावेळी केली.
    या बैठकीसाठी पश्चित महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. हर्षला वेदक, ए.एम. पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!