• महावितरणच्या गो-ग्रीन सेवेचा स्वीकार !
कोल्हापूर • प्रतिनिधी
महावितरणने वीजग्राहकांना गो ग्रीन सेवेद्वारे ई- मेलवर वीजबिल पाठविण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. या सेवेसाठी नोंदणीकृत ग्राहकांना दरमहा छापील कागदी वीज बिलाऐवजी ई- मेलवर वीजबिल पाठविले जाते. शिवाय वीजबिलात १० रुपयांची सवलतही दिली जाते. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील १८ हजार ५१ वीजग्राहकांनी गो ग्रीन सेवेचा लाभ घेऊन पर्यावरण संवर्धनास हातभार लावला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील १० हजार ८१२ तर सांगलीच्या ७ हजार २३९ वीजग्राहकांनी गो ग्रीन सेवेसाठी नोंदणी केली आहे. पर्यावरण हितार्थ कागद वाचवून झाडे वाचविण्यासाठी वीज ग्राहकांनी गो ग्रीन सेवेची निवड करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. वीजग्राहकांनी गो ग्रीन सेवा निवडीसाठी https://pro.mahadiscom.in/Go-Green/gogreen.jsp या लिंकचा वापर करावा. या लिंकवर आपल्या वीजग्राहक क्रमांक व बिलिंग युनिट आधारे ई-मेल पत्ता व छापील वीजबिलावर डाव्या कोपऱ्यात चौकटीत दिलेला १५ अंकी बिल नं/गो ग्रीन क्रमांक (GGN)नोंदवून सेवेची निवड करावी. त्यानंतर गो ग्रीन सेवा नोंदणी पूर्ण करण्यासाठी आपल्या ई- मेल पत्त्यावर आलेल्या लिंकवर क्लिक करा. आपले वीज बिल स्पॅम फोल्डरमध्ये जाऊ नये यासाठी महावितरणचा msedcl_ebill@mahadiscom.in हा ई- मेल पत्ता आपल्या ई- मेल वरील पत्त्यात नोंद करून घ्या. तेंव्हा वीज ग्राहकांनी गो ग्रीन सेवेचा लाभ घ्यावा, असे महावितरणने आवाहन केले आहे.