डायग्नोस्टिक सेंटर, पॅथॉलॉजी लॅबमध्ये कोरोना चाचण्यांचे दर नियंत्रीत करा

• भाजपाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
कोल्हापूर • प्रतिनिधी
      शहरातील डायग्नोस्टिक सेंटर, पॅथॉलॉजी लॅबमध्ये कोरोना चाचण्यांचे भरमसाठ दर नियंत्रीत करा, असे भाजपाच्यावतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना ई-मेलव्दारे निवेदन देण्यात आले आहे.   
     कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक चिंताग्रस्त आहेत. शहरातील अनेक डायग्नोस्टिक सेंटर, पॅथॉलॉजी लॅबमध्ये विविध चाचण्यांसाठी मनमानी पद्धतीने पैशांची आकारणी केली जात आहे. कोरोना पेशंटसाठी HRCT रिपोर्टसाठी घेण्यात येणाऱ्या फीमध्ये तफावत असल्याचे दिसत आहे. अशीच परिस्थिती कोरोनाच्या अन्य चाचण्यांमध्येदेखील आहे. अशाप्रकारच्या भरमसाठ फी आकारणीमुळे कोरोना संकटाने चिंतेत असलेले नागरिक आता आर्थिक पिळवणूकीमुळेही त्रस्त झाले आहेत. पेशंट बरा व्हावा या हेतूने पेशंटचे नातेवाईक उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या विविध चाचण्या करण्यासाठी पैसे खर्च करत आहेत. 
        भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने याप्रश्नी आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना इमेलद्वारे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये अशा सर्व चाचण्यांसाठी येणारा खर्च अधिक २० टक्के नफा असे सूत्र लक्षात घेता कोल्हापूर शहरातील विविध डायग्नोस्टिक सेंटर, पॅथॉलॉजी लॅब सेंटरच्या व्यवस्थापकांची संयुक्त बैठक घेऊन सेंटरमध्ये होणाऱ्या कोरोना चाचण्यांची भरमसाठ फी आकारणी नियंत्रीत करण्यात यावी व सर्व ठिकाणी एकसारखी करण्यात यावी, त्याचबरोबर प्रशासनाच्यावतीने शहरातील डायग्नोस्टिक सेंटरमध्ये चाचण्यांसाठी आकारण्यात येणाऱ्या रक्कमेचा शासनमान्य दर फलक लावून चाचण्यांचे निश्चित दर लोकांच्या माहितीसाठी वर्तमानपत्र, सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसिद्धीस द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
      या निर्णयामुळे अतिरिक्त शुल्काची बचत होऊन पीडित व्यक्तींना ज्यादा पैसे द्यावे लागणार नाहीत आणि काही प्रमाणात नागारिकांना दिलासा मिळणार आहे. भारतीय जनता पार्टीच्यावतीने आवाहन करण्यात येते की, ज्यांना आपल्याकडून अशा डायग्नोस्टिक सेंटर, पॅथॉलॉजी लॅबमध्ये ज्यादा फी आकारणी केली जात आहे असे वाटते अशा नागरिकांनी भारतीय जनता पार्टीशी संपर्क साधावा असे पत्रक प्र.का.सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई यांच्यावतीने प्रसिद्धीस दिले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *