शिवाजी विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ शनिवारी: ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनकर साळुंके प्रमुख पाहुणे

Spread the love

• ऐश्वर्या मोरे राष्ट्रपती सुवर्णपदकाची तर स्वाती पाटील कुलपती सुवर्णपदकाची मानकरी
कोल्हापूर • प्रतिनिधी
     शिवाजी विद्यापीठाचा ५८वा दीक्षान्त समारंभ शनिवारी (दि.५) सकाळी ११ वाजता ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत विशेष अतिथी म्हणून तर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनकर एम. साळुंके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे प्रमुख उपस्थित होते.
       कुलगुरू डॉ. शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर, गतवर्षीप्रमाणे यंदा होणारा ५८वा दीक्षान्त समारंभही ऑनलाईन आयोजित केला आहे. सकाळी ११ वाजता शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात होणाऱ्या या समारंभास कुलगुरू, प्र-कुलगुरूंसह वरिष्ठ अधिकारी व सर्व अधिष्ठाता प्रत्यक्ष तर मान्यवर अतिथी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत. या समारंभात एकूण ६२,३६० स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येतील. यामध्ये विद्यार्थिनींची संख्या ३२,५२० (५२.१५%) इतकी लक्षणीय आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या १९ असून त्यात दोन पीएच.डी. धारक स्नातकांचाही समावेश आहे. यावर्षी महाविद्यालयीन स्तरावरील पदवी प्रदान समारंभ होणार नसून याच मध्यवर्ती दीक्षान्त समारंभाच्या माध्यमातून सर्व स्नातकांना पोस्टाद्वारे पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
      याप्रसंगी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी विद्यापीठाच्या प्रतिष्ठेच्या राष्ट्रपती सुवर्णपदक आणि कुलपती सुवर्णपदक प्राप्त स्नातकांच्या नावांचीही घोषणा केली. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात क्रीडा, बौद्धिक व कला क्षेत्र आणि एनसीसी, एनएसएस यांमधील गुणवत्ता तसेच व्यक्तीमत्त्व, शारीरिक आरोग्य, भाषा शुद्धता, सर्वसाधारण ज्ञान, वागणूक व नेतृत्व गुण यामध्ये आदर्श ठरल्याबद्दल विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागात द्वितिय वर्षात शिकणाऱ्या ऐश्वर्या आकाराम मोरे (मु.पो. वडरगे, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) या विद्यार्थिनीस शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रपती सुवर्णपदक जाहीर करण्यात आले. त्याचप्रमाणे एम.ए. (हिंदी) परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल सांगली येथील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाच्या स्वाती गुंडू पाटील (मु.पो. दानोळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) या विद्यार्थिनीस कुलपती सुवर्णपदक जाहीर करण्यात आले.
               ‘शिव-वार्ता’वरून थेट प्रसारण…..
       विद्यापीठाच्या या दीक्षान्त समारंभात प्रत्यक्ष कोणतेही पारितोषिक अथवा पदवी प्रदान करण्यात येणार नाही. त्यासंदर्भात स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. त्याचप्रमाणे निमंत्रितांनीही कार्यक्रमस्थळी प्रत्यक्ष उपस्थित न राहता विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ (https://www.youtube.com/c/ShivVarta) या युट्यूब वाहिनीवरच सकाळी १०.४५ वाजता ऑनलाईन उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिर्के यांनी याप्रसंगी केले.
——————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!