शंभर टक्के लसीकरणाच्या उद्दिष्टासाठी सहकार्य करावे: प्रशासक डॉ.बलकवडे

Spread the love

  
कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोव्हीडवरील लस सुरक्षित असून कोरोनाच्या प्रतिबंधासाठी शंभर टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी मदरसा आणि जवळ असलेल्या शाळांमध्ये विशेष लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात येईल, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले. त्या शहरातील सर्व मदरसा, मस्जिद, दर्गा यांच्या धर्मगुरू आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत बोलत होत्या. 
     कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे शहरात १६ जानेवारी २०२१ पासून कोव्हीड लसीकरण मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत जास्तीत जास्त लसीकरण व्हावे यासाठी विशेष लसीकरण कॅम्पचे आयोजन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगरपालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात शहारातील सर्व मदरशांच्या धर्मगुरु आणि त्यांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली.
     या बैठकीत प्रारंभी जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.फारुक देसाई यांनी जिल्ह्यात १८ वर्षावरील ३० लाख नागरीक आहेत. यातील २४ लाख ७० हजार नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे तर बहुतांश नागरिकांनी दुसरा डोसही घेतला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे तर काही ठिकाणी कमी प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. 
     या बैठकीत सदरबाजार मशिदीचे मौलाना सय्यद यांनी मशिदीमध्ये येणाऱ्या सर्वांना इमाम हे लसीकरण करुन घेण्याबाबत आवाहन करत आहेत. काही लोकांमध्ये व्हॅटस्अपच्या चुकीच्या मॅसेजमुळे संभ्रमावस्था आहे. याबाबत लोकांमध्ये जागरुकता होणे गरजेचे आहे. त्यासाठी तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन झाले पाहिजे, अशी सुचना मांडली. मुस्लीम बोर्डींगचे गणी आजरेकर यांनी कोरोनाची  दुसरी लाट ओसरल्याने नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरविली आहे. त्यासाठी मदरसामध्ये दर शुक्रवारी विशेष कॅम्पचे आयोजन करावे. ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही त्यांची यादी मदरशामध्ये द्यावी. जेणेकरुन त्यांना फोनद्वारे बोलावून घेऊन कॅम्पमध्ये लसीकरण करणे शक्य होईल असे सांगितले. शिवाजी रोड मशिदीचे अजीज भोरी यांनी मशिदीमध्ये जेवढे लोक संपर्कात येतात त्या सर्वांना लसीकरणाबाबत सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळें आमच्या भागात ९८ टक्के लसीकरण झाले आहे. काही व्याधीग्रस्त नागरिकांचे लसीकरण बाकी आहे त्यांना घरी जाऊन लस द्यावी अशी सूचना केली. 
     प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी शहरात शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. लसीकरणाबाबतीत अद्यापही काही नागरिकांच्या शंका असल्यास त्यांच्या शंकांचे निरसन बैठक घेऊन करण्यात येईल. तर ज्या व्याधीग्रस्त नागरिकांना अद्याप लस मिळाली नाही त्यांना लस देण्यात येईल. कोव्हीडवरील लस सुरक्षित असून शहरात शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. त्यासाठी मदरसा आणि मदरसाजवळ असलेल्या शाळांमध्ये विशेष लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात येईल. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक डॉ. बलकवडे यांनी केले.
     या बैठकीत उपायुक्त रविकांत अडसूळ यांनी शुक्रवार दि.२२ ऑक्टोबरला रोजी शहरातील लाईनबाजार, सदरबाजार बावडा, यादवनगर, सिरत मोहल्ला सुभाषनगर, मणेर मशिद शनिवार पेठ, मुस्लीम बोर्डींग दसराचौक, बिडी कॉलनी व बडी मशिद बिंदू चौक या आठ ठिकाणी दुपारी २ ते ५ या वेळेत लसीकरण करण्याचे नियोजन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येईल. या ठिकाणी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं अवाहन केले. या बैठकीला शहरातील मदरसा, मस्जिद, दर्गा यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!