कोल्हापूर • प्रतिनिधी
सहकारामुळे सर्वसामान्य गोरगरीब माणसाचीही समाजात पत निर्माण झाली असून सहकारामुळेच गोरगरिबांची उन्नती झाली आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
६७ व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयात ध्वजारोहण अध्यक्ष श्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना नाम. मुश्रीफ म्हणाले, सहकारामधूनच तयार झालेली साखर कारखानदारी, बँकिंग व इतर अनेक संस्था यामुळेच राज्यासह देशाची आर्थिक घडी मजबूत आहे. त्यामुळे सामान्यातील सामान्य माणसाची जीवनमानही उंचावले आहे. विशेषता: पश्चिम महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सहकाराचे योगदान मोठे आहे.सहकार चळवळ निकोप, पारदर्शक हवी. सहकाराचा स्वाहाकार होता कामा नये. यासाठी पदाधिकाऱ्यांबरोबरच अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही जबाबदारी, प्रामाणिकपणा आणि नैतिकतेने काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
यावेळी संचालक मंडळातील ज्येष्ठ संचालक अनिल पाटील, आर. के. पोवार, बाबासाहेब पाटील – आसुर्लेकर, प्रताप उर्फ भैय्या माने, असिफ फरास, संतोष पाटील, रणजितसिंह पाटील, बी.आर.पाटील, ए.बी.परुळेकर, भगवानराव पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए.बी. माने यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद व्हराबळे यांनी केले. आभार गोरख शिंदे यांनी मांनले.