कोपा अमेरिका: अर्जेंटिना विजेता तर ब्राझील उपविजेता

Spread the love

• आता मध्यरात्रीच्या इटली – इंग्लंड सामन्याची उत्कंठा
कोल्हापूर • प्रतिनिधी
      अखेर अर्जेंटिनाने बाजी मारली. कोपा अमेरिका चषक फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये अर्जेंटिनाने ब्राझीलचा १- ० ने पराभव करून जेतेपदाला गवसणी घातली. पूर्वार्धात एंजेल डी मारिया याने नोंदविलेल्या एकमेव गोलच्या जोरावरच अर्जेंटिनाने २८ वर्षांनी विजेतेपद मिळविले. स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी व अर्जेटिनासाठी हे यश म्हणजे अविस्मरणीय क्षण आहे. यजमान ब्राझीलला पराभवामुळे  उपविजेपदावर समाधान मानावे लागले.
     दरम्यान, आज सकाळी झालेल्या अर्जेंटिना – ब्राझील या सामन्याचा आनंद फुटबॉलप्रेमींनी लुटला. कोल्हापूर शहरासह उपनगरात स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि नेमार यांचे असंख्य चाहते आहेत, त्यांच्यासह अनेकांना दिग्गज संघातील चुरशीच्या सामन्यातील अटीतटीचा खेळ पहायला मिळाला. अर्जेटिनाने पूर्वार्धात ब्राझीलवर आघाडी घेतली. सेंटर सर्कलपासून मिळालेल्या लॉंग पासवर डी मारियाने चेंडूवर ताबा मिळवला आणि खोलवर चढाई करून गोलरक्षकाला चकवा देत चेंडूला थेट गोलजाळ्याची दिशा दाखवली. २२ व्या मिनिटास एंजेल डी मारियाने गोल करुन संघाला आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धातील १-० गोलची  आघाडी कायम राखत अर्जेंटिनाने विजयावर शिक्कामोर्तब करून तब्बल २८ वर्षानंतर चषकावर नाव कोरलं. अर्जेंटिनाने ब्राझीलवर मात करून जेतेपद मिळवताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मेस्सी व अर्जेंटिनाच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत विजेतेपदाचा आनंद व्यक्त केला. एकंदरीत रविवारचा दिवस म्हणजे निवांतपणा असे समीकरण असलेल्या कोल्हापूरकरांनी आज पहाटे लवकर उठून अर्जेंटिना – ब्राझील सामन्याचा आनंद लुटला.
     आता सर्वांना उत्कंठा आहे ती, युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्याची. आज मध्यरात्री १२:३० वाजता इटली विरूद्ध इंग्लंड विजेतेपदासाठी लढत होईल. दोन्ही तुल्यबळ संघात होत असलेल्या या लढतीत कोण विजेता होणार, याचीच उत्सुकता आहे.
                  युरो कप स्पर्धेचे विजेते…… 
     युरो कप फुटबॉल स्पर्धेचा हा १६ वा हंगाम आहे. इटली आणि इंग्लंड संघात आता विजेतेपदासाठी लढत होईल. इटलीसाठी हे दुसरे तर इंग्लंड संघासाठी हे पहिलेच विजेतेपद असेल. ही स्पर्धा १९६० पासून प्रत्येक चार वर्षांनी होते. आतापर्यंत झालेल्या १५ स्पर्धेत जर्मनीने दबदबा दाखविला आहे. हा संघ सहावेळा फायनलमध्ये पोहोचला तर १९७२, १९८०, आणि १९९६ असे तीनवेळा त्यांनी जेतेपद पटकावले आहे. स्पेनच्या संघानेही चारवेळा फायनल गाठली असून यात त्यांनी १९६४, २००८ आणि २०१२ असे तीनवेळा जेतेपद मिळवले आहे. फ्रान्सने तीनवेळा फायनलमध्ये धडक मारताना १९८४ आणि २००० मध्ये विजेतेपद मिळविले. सोविएत युनियन (१९६०), इटली (१९६८), चेक प्रजासत्ताक (१९७६), पोर्तुगाल (२०१६), नॅदरलंड (१९८८), डेन्मार्क (१९९२), ग्रीस (२००४) यांनी प्रत्येकी एकदा जेतेपद पटकावले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!