• मेस्सी आणि नेमार आमने-सामने
कोल्हापूर • प्रतिनिधी
कोपा अमेरिका चषक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिना संघाने फायनलमध्ये धडक मारली. भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी (दि.७) सकाळी साडेसहा वाजता झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने कोलंबिया संघावर पेनल्टी शूटआऊटवर मात केली. अर्जेंटिनाच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो, त्यांचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेज!
आता रविवारी (दि.११) अर्जेंटिना विरूद्ध ब्राझील जेतेपदासाठी लढत होईल. यजमान ब्राझीलने पेरूवर १-० गोलने विजय मिळवून आधीच अंतिम फेरीत गाठली आहे. अर्जेंटिना आणि ब्राझील या दोन तुल्यबळ संघात अंतिम लढत होणार असली तरी फुटबॉलप्रेमींमध्ये चर्चा आहे ती, स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि नेमार यांची. विजेतेपदासाठी होणाऱ्या या सामन्यात अर्जेंटिनाचा मेस्सी आणि ब्राझीलचा नेमार आमने-सामने येणार आहेत. या दोघा स्टार फुटबॉलपटूंचा जादूई खेळ आणि दोघांपैकी कोण आपल्या संघाला जेतेपद मिळवून देतो, याकडेच सर्व फुटबॉलशौकिनांचे लक्ष लागून राहिले आहे.
सध्या युरो चषक आणि कोपा अमेरिका चषक फुटबॉल स्पर्धेकडे फुटबॉलप्रेमींच्या नजरा लागून आहेत. अमेरिकन देशात खेळल्या जाणाऱ्या कोपा अमेरिका चषक फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामना अर्जेंटिना विरूद्ध ब्राझील होणार आहे. या सामन्यात जागतिक फुटबॉलमधील स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि नेमार यांचा सहभाग असल्याने उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ब्राझीलने अटीतटीने खेळल्या गेलेल्या सामन्यात पेरूवर १-० गोलने मात केली. नेमारने दिलेल्या पासवर लुकासने नोंदविलेल्या या एकमेव गोलच्या जोरावरच ब्राझीलने पेरूवर मात केली आणि अंतिम फेरी गाठली आहे.
त्यानंतर, आज सकाळी साडेसहा वाजता झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने कोलंबिया संघावर पेनल्टी शूटआऊटवर ३-२ ने विजय मिळवून अंतिम फेरीत धडक दिली. पूर्णवेळेत हा सामना १-१ असा बरोबरीत राहिला. अर्जेंटिनाच्या लॉटेरो मार्टिनेज याने पूर्वार्धात ७ व्या मिनिटास नोंदविलेल्या गोलची उत्तरार्धात कोलंबियाच्या लुई डियाजने ६१ व्या मिनिटास परतफेड करत सामना बरोबरीत आणला. पेनल्टी शूटआऊटवर मात्र अर्जेंटिनाने ३-२ असा विजय मिळविला. पेनल्टीवर अर्जेंटिनाच्या मेस्सी, परेडेस, मार्टिनेझ यांनी अचूक गोल केले. कोलंबियाच्या कुएड्राडो आणि बोर्जा यांनाच गोल करण्यात यश आले. अर्जेंटिनाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला तो गोलरक्षक एमिलोयानो मार्टिनेजने ! त्याने अप्रतिम गोलरक्षण करीत पेनल्टी शूटआऊटमध्ये कोलंबियाचे तीन फटके रोखून संघाला महत्वपूर्ण विजय मिळवून देत अंतिम फेरी गाठून दिली.