भारत-थायलंडमध्ये व्दिपक्षीय व्यापारवृद्धीसाठी अगणित संधी: ललित गांधी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      डिपार्टमेंट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड प्रमोशन, थायलंड आणि मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स रॉयल थाय गव्हर्नमेंट यांच्यावतीने आणि महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या सहकार्याने हडपसर  पुणे येथील लक्ष्मी लॉन येथे तीन दिवसीय टॉप थाय ब्रॅण्ड – ट्रेड फेअर-२०२२ चे उदघाटन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी व रॉयल थाई कॉन्सुल जनरल डोनाविट पूलसावत यांच्या हस्ते झाले.
       याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी रॉयल थाई कॉन्सुल जनरल  डोनाविट पूलसावत यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी इंडो थाई चेंबर ऑफ एमएसएमइचे अध्यक्ष  रोहित मेहता, चेतन नरके, मनीष पाटील उपस्थित होते.
       ललित गांधी यांनी भारत आणि थायलंड दरम्यान सध्यस्थितीत १२.५ बिलिअन डॉलरचा व्यवसाय होत असून भविष्यात यामध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत दिसत असल्याचे सांगितले. भारताचे धोरण ॲक्ट इस्ट आणि थायलंडचे धोरण लुक वेस्ट जे एकमेकांना पूरक आहे. जागतिक पातळीवरील बदलत्या राजकीय घडामोडीचा फायदा थायलंड आणि भारताच्या एकत्रित आर्थिक विकासासाठी आणि भारत आणि थायलंड मध्ये व्दिपक्षीय व्यापारवृद्धीसाठी अगणित संधी निर्माण करणारा असून हा ट्रेड शो स्थानिक उद्योग आणि उद्योजकांना चालना देऊन नवी रोजगार निर्मिती करणारा होईल असे  महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.
      रॉयल थाई कॉन्सुल जनरल डोनाविट पूलसावत यांनी उभय देशातील व्यापारी संबंध वृद्धिंगत करणे, दोन्ही देशातील उद्योजकांमध्ये व्यापारी करार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून यामध्ये दोन्ही देशामधील उद्योजकांना उद्योग संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. यातून आर्थिक, बौद्धिक गुंतवणुकीसह रोजगार आणि उद्योगाच्या नवनवीन संधी निर्माण होणार असल्याचे रॉयल थाई कॉन्सुल जनरल डोनाविट पूलसावत यांनी सांगितले.
       महाराष्ट्र चेंबरच्या इंटरनॅशनल रिलेशन समितीचे को चेअरमन चेतन नरके यांनी राज्यातील व्यापार उद्योग वाढावा, जागतिक स्तरावर महाराष्ट्रातील व्यापार उद्योगाला स्थान मिळावे, आयात निर्यात वाढावी यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या  इंटरनॅशनल रिलेशन समितीच्या माध्यमातून सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. 
       हेल्थ ॲण्ड ब्युटी, फूड ॲण्ड बेवरेज, फर्निचर आणि फॅशन या चार श्रेणीतील थायलंड मधील ३४ उद्योजक/उत्पादक/ संस्था यामध्ये सहभागी झाले आहेत. या ट्रेड शोसाठी थायलंड सरकारचे अधिकारी आणि थायलंडमधील उद्योजक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!