कोल्हापूर जिल्हा जनरल प्रॅक्टीनर्स असोसिएशनतर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 

Spread the love

• ९ ते १५ मे दरम्यान शास्त्रीनगर मैदानावर रंगणार स्पर्धा
कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूर जिल्हा जनरल प्रॅक्टीनर्स असोसिएशनच्यावतीने वर्षभर सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक उपक्रम राबवले जातात. याअंतर्गत असोसिएशनच्या वतीने ९ ते १५ मे या कालावधीत शास्त्रीनगर मैदानावर राज्यस्तरीय डॉक्टरांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सरदार पाटील आणि डॉ.बद्रुद्दीन मणेर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
       स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, ९ मे रोजी सकाळी १० वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होईल. कोल्हापूर जिल्हयात प्रथमच डॉक्टरांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली असून, या स्पर्धेत डॉक्टरांचे १६ संघ राज्यभरातून सहभागी होणार आहेत. ९ ते १५ मे या कालावधीत रोज सकाळी ८ ते रात्री १० या कालावधीत शास्त्रीनगर मैदानावर हे सामने होणार आहेत. १० षटकांचा एक सामना, याप्रकारे दररोज ५ सामने होणार असून, स्पर्धा कालावधीत एकूण ३२ सामने होतील. अंतिम सामना १५ मे रोजी होईल. स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला ५० हजार ५५५ रूपये आणि चषक तर उपविजेत्या संघाला ३५ हजार ५५५ रुपये आणि चषक तसेच तृतीय क्रमांकाला २५ हजार ५५५ रूपये चषक दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द मॅच अशी बक्षिसेही दिली जाणार आहेत.
       यावेळी डॉ. अशोक रणदिवे, डॉ. विठ्ठल पाटील, डॉ. संजय केटकाळे, डॉ. वसंत पाटील, डॉ. अनिल कांबळे, डॉ. आर. व्ही. पाटील, डॉ. विलास देशमुख, डॉ. सुनील देसाई उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!