कोल्हापूर • प्रतिनिधी
कोरोनामुळे अतिगंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झालेल्या गडहिंग्लज तालुक्यातील ६८ वर्षीय महिलेला तब्बल महिनाभराच्या यशस्वी उपचारानंतर नवजीवन मिळाले आहे. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या कोविड विभागातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नामुळे बुधवारी ही महिला कोरोनामुक्त होऊन घरी परतली.
गडहिंग्लज तालुक्यातील कडेगाव येथील ही महिला २६ एप्रिल रोजी श्वासोच्छवास घेण्यास त्रास व सतत येणारा ताप या कारणांनी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. या महिलेचे लसीकरण झाले नव्हते. एचआरसीटीमध्ये व्हायरल न्यूमोनिया व सीटी स्कोअर १६ / २५ दिसून आला. तिचा स्वॅब अहवालही पॉझिटिव्ह आल्याने तिला एमआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. येथे ऑक्सिजन लेव्हल ६४% पर्यंत खाली असल्याने गंभीर स्थितीत तिला आयसीयूमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथे एनआरबीएम ऑक्सिजन मास्क लाऊन कोविड -१९ मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार सुरू करण्यात आले. मात्र ऑक्सिजन पातळीत योग्य वाढ न झाल्याने एनआयव्ही उपचार सुरू करण्यात आले.
रुग्णाचे बारकाईने परीक्षण केले आणि छातीच्या एक्सरेची पुनरावृत्ती केली असता एबीजीने सुधारणा दिसून आली. त्यामुळे ऑक्सिजन प्रवाह हळूहळू कमी करण्यात आला. ऑक्सिजन पातळीत सुधारणा होऊ लागल्याने सुमारे पंधरा दिवसांनी तिला जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले. तेथे ऑक्सिजन थेरपी आणि स्पायरोमेट्री व्यायाम व अन्य उपचार यामुळे तिची ऑक्सिजन पातळी ९५% राखली गेली. यामध्ये सातत्य राहून २६ मे रोजी ती पूर्णपणे बरी झाल्याने तिला डिस्चार्ज देण्यात आला.
अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या या कोरोनाग्रस्त महिलेला जीवदान मिळाल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. महिलेवर यशस्वी उपचार करून तिला नवे जीवन देणारे डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे कोरोना विभाग प्रमुख डॉ. राजेश ख्यालाप्पा, सर्व डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचाऱ्यांचे त्याचबरोबर असिस्टंट रजिस्ट्रार अजित पाटील यांचे त्यांनी आभार मानले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष व गृह राज्यमंत्री सतेज पाटील, विश्वस्त आ. ऋतुराज पाटील, अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, वैद्यकीय अधिक्षिका डॉ. वैशाली गायकवाड यांनी कोरोनामुक्त झालेली महिला व तिच्यावर उपचार करणाऱ्या कोरोना विभागातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.