कोल्हापूर • प्रतिनिधी
शहर आणि परिसरातील गणेश मंदिरांमध्ये आज संकष्टीनिमित्त श्री गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टंन्स या कोरोनाविषयीच्या नियमांचे पालन करत श्री गणेशाचे दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना केली.
संकष्टी चतुर्थीचा उपवास अनेक गणेशभक्त करतात. कालच नव्या वर्षाला (सन २०२१) प्रारंभ झाला. आज दुसऱ्याच दिवशी संकष्टी आली. संकष्टीनिमित्त श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांसह अनेकांनी मंदिरांमध्ये गर्दी केली. ओढ्यावरचा गणपती – सिध्दीविनायक, बिनखांबी गणेश मंदिर, स्वयंभू गणेश, सिध्दी गणेश, गारेचा गणपती, पितळी गणपती, खडीचा गणपती, सिध्द बटूकेश्वर आदी गणेश मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची विशेष गर्दी होती.
यावर्षी १३ संकष्टी चतुर्थी
साधारणपणे महिन्यात एक याप्रमाणे वर्षात १२ संकष्टी चतुर्थी असतात. परंतु सन २०२१ मध्ये एकूण १३ संकष्टी चतुर्थी आल्या आहेत. जानेवारी आणि मार्च महिन्यात प्रत्येकी दोन संकष्टी आल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात संकष्टी नाही. गतवर्षी एकही अंगारकी संकष्टी चतुर्थी नव्हती. मात्र यावर्षी तीन अंगारकी संकष्टी चतुर्थीचा योग गणेशभक्तांना आला आहे