बारडवाडीमध्ये आर्थिक डिजिटल कार्यक्रमाला ग्राहकांचा प्रतिसाद


 कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात, अगदी डोंगर कपारीतील वाड्या-वस्त्यांवर आर्थिक साक्षरतेची फार मोठी गरज आहे. केडीसीसी बँकेच्यावतीने हे काम अत्यंत प्रभावीपणे सुरू आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी काढले. बारडवाडी (ता. राधानगरी) येथे आयोजित आर्थिक डिजिटल जागृती कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव होते.
      यावेळी श्री. पाटील पुढे म्हणाले, शहरीकरणापासून दूरवर असलेल्या खेड्यापाड्यातील ग्राहकाला बँकिंग विशेषतः डिजिटल बँकिंग समजावे म्हणून हा उपक्रम अतिशय उपयुक्त आहे. जिल्हा बँकेने या क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे.
      नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव म्हणाले, नाबार्डने केडीसीसी बँकेच्या माध्यमातून हा कार्यक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम उद्दिष्टापेक्षाही अतिशय चांगल्या पद्धतीने राबविला जात आहे.
      प्रास्ताविकपर भाषणात जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने म्हणाले, केडीसीसी बँकेने तंत्रज्ञानात गरुड झेप घेतलेली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने ग्राहकांच्या वेळ व पैशाचा अपव्यय टाळून गतिमान सेवा देण्यासाठी बँक कटिबद्ध आहे.
      दरम्यान; याआधी राधानगरी तालुक्यातील संकपाळवाडी, पालकरवाडी, चांदेकरवाडी, चंद्रेपैकी गणेशवाडी व मोरेवाडी, तारळे खुर्द, घोटवडे, शिरगाव, येळवडे, आकनूर, धामोड, म्हासुर्ली, आडोली आदी गावांमध्ये आर्थिक साक्षरता मेळाव्यामधून मार्गदर्शन झाले.
     स्वागत मारुती बारड यांनी केले. प्रास्ताविक आर्थिक साक्षरता केंद्राचे राधानगरी तालुका प्रमुख रामराव इंगळे यांनी केले. अनिल सिद्धेश्वर यांनी आभार मानले.
     यावेळी विष्णूमामा बारड, सर्जेराव बारड, बळवंतराव बारड, तालुका सीआरपी सौ. पवार, रणजीत पाटील, बचत गट संघटक सौ. गीता पाटील, बँकेचे विभागीय अधिकारी विजय तौदकर, बँक निरीक्षक शामराव पाटील व रमेश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. तसेच राधानगरी तालुक्यातील सेवा संस्था, दूध संस्था व सहकारी संस्थांचे सचिवही यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *