डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा गुरुवारी शरद पवार यांच्या हस्ते शुभारंभ

• कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांची माहिती
कोल्हापूर • प्रतिनिधी
     गेल्या चार दशकापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने तळसंदे येथे स्थापन करण्यात आलेल्या डी. वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा शुभारंभ गुरुवार दि. १ जुलै रोजी व्हर्च्युअल पद्धतीने होणार आहे. माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते विद्यापीठाचे उद्घाटन होईल. यावेळी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, कृषिमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आ.प्रकाश आबिटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी दिली.
      उच्च व तंत्र शिक्षणाच्या सुविधा सर्व विद्यार्थ्यापर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी डी. वाय. पाटील ग्रुपची स्थापना केली. गेल्या चार दशकापासून मेडिकल, नर्सिंग, फिजिओथेरपी, इंजिनिअरिंग, ॲग्रीकल्चर, मॅनेजमेन्ट आदी विविध क्षेत्रामध्ये हा ग्रुप कार्यरत आहे. या ग्रुपचे कृषी व तंत्रज्ञान क्षेत्रातील खासगी विद्यापीठ तळसंदे येथे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून सुरु होत आहे. १ जुलै रोजी सकाळी १० वाजता पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने नव्या विद्यापीठाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती डॉ. संजय डी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
     यावेळी ग्रुपचे उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, कुलगुरू डॉ. के. प्रथापन आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *