कोल्हापूर • प्रतिनिधी
गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘नॅशनल असेसमेंट अँड अक्रीडेशन कौन्सिल’कडून (नॅक) आणखी तीन वर्षांसाठी ‘अ’ श्रेणी जाहीर झाली आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कमोर्तब झाले आहे.
देशभरात विविध शिक्षण संस्थांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या डी. वाय. पाटील ग्रुपचे पहिले महाविद्यालय असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी १९८४ मध्ये कसबा बावडा येथे स्थापना केली होती. गेल्या ३८ वर्षांच्या काळात महाविद्यालयाने उत्कृष्ट शैक्षणिक परपरा जपत हजारो उत्तम अभियंते घडवले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयाला डिसेंबर २०२० मध्ये स्वायत्त संस्थेचा दर्जा दिला आहे. त्याचबरोबर २०१८ मध्ये पाच वर्षासाठी ‘नॅक’ अ श्रेणी जाहीर करण्यात आली होती.
विद्यार्थी केंद्रबिंदू मानून महाविद्यालयाकडून राबवले जात असलेले विविध प्रयोग, सर्वोत्तम पायाभूत सुविधा, संस्थेत दिले जात असलेलेल गुणवत्तापूर्ण शिक्षण, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त राबवलेल जाणारे विविध उपक्रम, वैशिष्ट्यपूर्ण टीचिंग- लर्निंग प्रोसेस, कोरोना काळात सर्वप्रथम सुरु केलेले ऑनलाईन शिक्षण, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी केले जात असलेले प्रयत्न, उत्तम प्लेसमेंट रेकॉर्ड या सर्वाची दखल घेत ‘नॅशनल असेसमेंट अँड अक्रीडेशन कौन्सिल’ने महाविद्यालयाला दिलेल्या ‘अ’ श्रेणीची मुदत आणखी तीन वर्षांनी वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या विशेष कार्यक्रमात डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने मिळवलेल्या या यशाबद्दल कौतुक करण्यात आले. संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे यांनी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, प्रोजेक्ट हेड सदानंद सबनीस उपस्थित होते.