राजर्षी शाहू फूड व्हॅन’साठी डी.वाय. पाटील ग्रुपकडून गाडी भेट

• उपाध्यक्ष नाम.सतेज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य
कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूर शहरामध्ये विविध समारंभामधून वाया जाणारे अन्न सामाजिक भावनेतून गरिब व गरजवंत यांना पोहचविणाऱ्या प्रशांत मंडलिक यांच्या ‘राजर्षी शाहू फूड व्हॅन’ या उपक्रमासाठी डी. वाय. पाटील ग्रुप कोल्हापूरच्यावतीने सोमवारी ईको व्हॅन भेट देण्यात आली आहे. ग्रुपचे उपाध्यक्ष व राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते या गाडीच्या किल्ल्या मंडलिक यांना प्रदान करण्यात आल्या.
      अन्न हे पूर्णब्रम्ह असून शिल्लक अन्नाची नासाडी रोखून ते योग्य माणसांपर्यंत पोहचवण्याचे अत्यंत महत्वाचे काम मंडलिक व त्यांचे सहकारी करत आहेत. पर्यावरण संतुलनाबरोबरच  भूकेलेल्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान निर्माण करण्याचे दुहेरी कार्य त्यांच्याकडून होत आहे. त्यांच्या कार्याचा अधिक विस्तार व्हावा या हेतूने नाम. सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही व्हॅन डी. वाय. पाटील ग्रुपकडून भेट देण्यात येत आहे.
      ‘राजर्षी शाहू फूड व्हॅन’च्या माध्यमातून लाखो लोकांची भूक भागवली जाईल, असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. या आदर्शवत उपक्रमासाठी भविष्यातही  काही मदत लागल्यास लोकप्रतिनिधी म्हणून आपण नेहमीच पाठीशी राहु अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
      मंगळावर पेठेत राहणारे प्रशांत अरविंद मंडलिक हे सामजिक कार्यकर्ते गेल्या १० वर्षापासून समारंभातून शिल्लक राहणारे अन्न गोळा करून गरिबांना पोहचवण्याचे कार्य निस्पृह भावनेने करत आहेत. त्यासाठी अगदी रात्री उशिरापर्यतही त्यांची धडपड सुरु असते. लग्न समारंभ, वाढदिवस, महाप्रसाद याबरोबरच उत्तरकार्यामध्ये मोठ्या प्रमाणात अन्न शिल्लक राहून वाया जाते. आपल्याच घरातील एका समारंभादरम्यान शिल्लक राहिलेल्या अन्नाचे काय करायचे असा प्रश्न उभा राहिला. त्यातून हे अन्न ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे अशा गरीब लोकापर्यंत पोहचवण्याचा विचार मनात आला. याच घटनेतून या सामजिक कामाची सुरुवात झाल्याचे प्रशांत मंडलिक यांनी सांगितले. 
    गेल्या १० वर्षात शिल्लक अन्न घेऊन जाण्यासाठी येणारे कॉल व त्याच्या वितरणासाठी पूढे येणारे हातही वाढतच गेले. मात्र मुख्य अडचण होती ती इतक्या मोठ्या प्रमाणावर जमा होणारे अन्न साठवण्याची व त्याची जलद वाहतूक करण्याची. हे काम ते आपल्या दुचाकीवरूनच करत होते. यातूनच ‘राजर्षी शाहू फूड व्हॅन’ अन्नपूर्णा एक्स्प्रेस, कोल्हापूरची कल्पना आकाराला आली. आमदार ऋतुराज पाटील यांना या उपक्रमाची माहिती मिळताच या सामाजिक उपक्रमासाठी पुढाकार घेत डी. वाय. पाटील ग्रुपच्या वतीने ‘फूड व्हॅन’ देण्याचे त्यांनी जाहीर केले. त्यानुसार ग्रुपचे उपाध्यक्ष, राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी या  ईको व्हॅनच्या किल्ल्या प्रशांत  मंडलिक यांना प्रदान करण्यात आल्या.
   यावेळी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. राकेश शर्मा, सीएचआरओ श्रीलेखा साटम, संशोधन संचालक डॉ. सी. डी. लोखंडे, उपकुलसचिव संजय जाधव, मेडिकल बायोटेक्नोलॉजी विभाग प्रमुख डॉ. मोहन करुपाइल आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *