कोल्हापूर • प्रतिनिधी
बहीण भावाचं पवित्र नात जगप्रसिद्ध आहे. भगिनी प्रेमाची अशीच प्रचिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी व्यक्त केली आहे. संजय पवार यांच्या ७८ वर्षीय भगिनी शकुंतला निकम या डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमधील यशस्वी उपचारानंतर कोरोना मुक्त झाल्या आहेत. पवार यांनी आपल्या बहीणीचं चक्क फुले टाकून आणि टाळ्याच्या गजरात स्वागत केले. तसेच त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलसह पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांचे त्यांनी विशेष आभार मानले आहेत.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या सातारा येथील भगिनी शंकुतला निकम यांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाचा हॉटस्पॉट असलेले सातारा येथे बेड उपलब्ध झाला नाही. त्यामुळे पवार यांनी कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलवर विश्वास व्यक्त करत येथे उपचारासाठी दाखल करण्याचा निर्णय घेतला. मात्र या ठिकाणचे बेडदेखिल फुल्ल होते. त्यामुळे बहिणीवर उपचार कसे करायचे अशा हतबल स्थितीत संजय पवार होते.
श्री.पवार यांनी पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्याशी संपर्क करत, बहिणीसाठी बेड उपलब्ध करून देण्याची विनंती केली. या दोन्ही लोकप्रतिनिधी तातडीने हालचाली करत शकुंतला निकम यांना उपचारासाठी बेड उपलब्ध करून दिला. शकुंतला यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर उपचारासाठी प्रचंड मेहनत घेतली. अखेर १८ दिवसांच्या उपचारानंतर मात्र शकुंतला यांनी कोरोनावर मात केली.
ज्या बहिणीने आई – वडिलांप्रमाणे आधार दिला, ती बहीण मृत्युच्या दाढेतून बाहेर पडल्यानंतर, डिस्चार्ज झाल्यावर संजय पवार व कुटूंबियांनी फुलांची उधळण करत स्वागत केले. आपली बहीण कोरोनासारख्या गंभीर आजारातून बरी होवून परतत असताना संजय पवार भावूक झाले.
पालकमंत्री सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील त्याचबरोबर डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलची वैद्यकीय टीम यांचे आभार मानताना त्यांना अश्रू अनावर झाले. डी. वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांचेदेखील आपल्याला विशेष सहकार्य लाभल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितले.
शकुंतला निकम यांच्यावर उपचारांसाठी अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, असिस्टंट रजिस्ट्रार अजित पाटील, कोरोना विभाग प्रमुख डॉ. राजेश ख्यालप्पा, डॉक्टर्स, परिचारिका यांनी मेहनत घेतली.
———————————————–