डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या तिसऱ्या पेटंटला मान्यता

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या ‘सेन्टर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च’ विभागातील संशोधकांनी दाखल केलेल्या तिसऱ्या पेटंटला भारतीय पेटंट प्राधिकरणाची मान्यता मिळाली.
     हे पेटंट ऊर्जा साठवणुकीसाठी उपयोगी अशा नाविन्यपूर्ण ‘कोबाल्ट फॉस्फेट फिल्म्स’ बनविण्याच्या सोप्या आणि कमी खर्चिक ‘सिलार’ या रासायनिक पद्धतीसाठी जाहीर झाले. रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे व मुख्य संशोधक डॉ. उमाकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधित आणि प्रमाणित केलेल्या या पद्धतीसाठी २०१९ साली संशोधकांनी पेटंट अर्ज दाखल केला होता. सदर पेटंट २७ ऑगस्ट २०२१ रोजी संशोधकांच्या नावे मंजूर केले गेले. या शोधाअंतर्गत प्रमाणित केलेली नावीन्यपूर्वक शोध पद्धती पुढील २० वर्षांसाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या नावे पेटंट स्वरूपात संरक्षित केली जाईल.
      यासंदर्भात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील २ महिन्यात डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या अंतर्गत निर्गमित झालेले हे सलग तिसरे पेटंट आहे. ही बाब विद्यापीठ व संशोधकांसाठी अत्यंत आनंददायी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
      मुख्य संशोधक डॉ. उमाकांत पाटील यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, “सिलार या सोप्या आणि प्रभावी पद्धतीने तयार केलेल्या ‘कोबाल्ट फॉस्फेट फिल्म्स” या विविध अनुप्रयोगांसाठी जसे कि विद्युत घट, सुपरकॅपॅसिटर, उत्प्रेरक अभिक्रिया, ई. मध्ये अत्यंत प्रभावी व कार्यक्षम सिद्ध झाल्या आहेत. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे (DST-SERB CRG/ INSPIRE) अर्थसहाय्य सदर संशोधनासाठी महत्वाचे ठरले.”  या संशोधनामध्ये मुख्य संशोधक डॉ. उमाकांत पाटील यांच्यासमवेत रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, रजिस्ट्रार डॉ. व्ही. व्ही. भोसले तसेच संशोधक विद्यार्थी प्रणव काटकर आणि सुप्रिया मरजे यांचा सहभाग होता.
      या पेटंट मिळवण्यामध्ये सहभागी संशोधकांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष गृह राज्यमंत्री सतेज डी. पाटील, संस्थेचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, तसेच कुलगुरु डॉ. राकेश कुमार मुदगल, प्र-कुलगुरु डॉ. शिम्पा शर्मा, डीन डॉ. राकेश शर्मा, वित्त अधिकारी श्रीधर नारायण स्वामी, परीक्षा नियंत्रक सल्लागार अरुण पोवार, परीक्षा नियंत्रक डॉ. ए. एन. जाधव, बायोटेक विभागप्रमुख डॉ. मोहन करुपाईल यांनी अभिनंदन केले.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!