श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टचे १५व्या वर्षात पदार्पण

Spread the love

• १४वा वर्धापनदिन सोहळा साधेपणाने साजरा 
कोल्हापूर • प्रतिनिधी
     शाकंभरी पौर्णिमेदिवशी मोफत भोजन प्रसाद सेवा सुरु केलेल्या श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टचा १४ वा वर्धापनदिन सोहळा मंगळवारी साजरा झाला. ट्रस्टने १५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या कपिलतीर्थ मार्केट येथील पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये हा वर्धापनदिन सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला.
                श्री महालक्ष्मी अन्नछत्रविषयी…..             
      साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. परगांवाहून येणाऱ्या भाविकांना भोजन प्रसाद उपलब्ध व्हावा म्हणून २००८ साली शाकंभरी पौर्णिमेदिवशी श्री महालक्ष्मी धर्मशाळेच्या हॉलमध्ये पहिला मोफत भोजन प्रसाद केला. येथूनच सामाजिक सेवेची परंपरा असलेल्या राजू मेवेकरी यांनी आपल्या सहकाऱ्यांना एकत्रित करून श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टचा पाया रचला. त्यावेळी प्रत्येक पौर्णिमेला हा सात्विक भोजन प्रसाद चालू ठेवण्यात आला. त्यानंतर प्रत्येक शुक्रवारी सुरू झाला. बाहेर गावाहून देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढू लागल्यावर प्रत्येक पौर्णिमा, शुक्रवार, शनिवार व  रविवार असा भोजन प्रसाद चालू झाला. २००८ साली सुरू झालेला हा उपक्रम श्री अंबाबाईच्या कृपाशिर्वादाने व भक्तांच्या सहकार्याने व्यापक आकार घेऊ लागला. सन २०१३ पासून मात्र श्री महालक्ष्मी अन्नछत्र हे दररोज चालू झाले आणि हजारो भाविक त्याचा लाभ घेऊ लागले. कोरोना प्रादुर्भावाच्या कालावधीत शासनाने लॉकडाऊन जाहीर केले होते, तो कालावधी वगळता दररोज हजारो भाविक या अन्नछत्राचा लाभ घेतात.
     श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टने “भक्ती  परमेश्र्वराची, सेवा मानवाची” हे ब्रीदवाक्य घेऊन मोफत भोजन प्रसादाचा उपक्रम सुरू केला. २००८ साली लावलेल्या इवल्याशा रोपट्याचा आता वटवृक्ष तयार होत आहे. विश्वासाच्या एक-एक टप्प्यावर श्री महालक्ष्मी अन्नछत्रचा वृक्ष बहरू लागला असून स्थानिक भाविकांसह अनेक दानशूर व्यक्ती अन्नछत्राला मदतीचा हात देत आहेत. या सर्वांच्या सहकार्याने सुरुवातीला महिन्यातून एकदा दिला जात असलेला भोजन प्रसाद आता दररोज दिला जातो. अनेक अडचणींवर मात करून केवळ समाजातील दानशूर व्यक्तींच्या पाठबळावरच उभ्या राहिलेल्या या उपक्रमाचे श्रेय ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजू मेवेकरी आजही देवीच्या भक्तांनाच देतात.
        श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट हे केवळ अन्नदानावर न थांबता सामाजिक उपक्रमात सहभागी आहे. समाजातील गोरगरीब जनतेला दिलासा दिला जात आहे. गरिबांच्या अडचणी, दीनदलित यांची उपेक्षा, नैसर्गिक आपत्ती यामध्येही श्री महालक्ष्मी अन्नछत्रने आपला सहभाग घेतला आहे. कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये पोलिस यंत्रणेला भोजन देऊन सामाजिक दायित्व पार पाडले. दिवाळी सणासाठी अनाथ मुलांना नवीन कपडे तसेच गरीब व गरजू ५०० कुटुंबांना प्रत्येकी पाच किलो दिवाळी फराळ देऊन गोरगरिबांना दिवाळी सण साजरा करण्यासाठी हातभार लावला जातो. सीपीआर रुग्णालयाच्या प्रसुती विभागात गरजूंना दररोज जेवणाचे डबे देऊन मदत केली जाते. तसेच रक्तदान उपक्रमही राबविण्यात येतो. अशाप्रकारे संस्था आता अन्नदानाशिवाय अनेक विधायक उपक्रम राबवित आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!