कोल्हापूर • प्रतिनिधी
शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन कोल्हापूर (स्मॅक)च्या अध्यक्षपदी दीपक पाटील तर उपाध्यक्षपदी एम. वाय.पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
शिरोली औद्योगिक क्षेत्रामधील उद्योजक व कामगार यांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी कार्यरत ‘स्मॅक’ या संस्थेच्या संचालक मंडळाची ३५वी सभा रविवारी अध्यक्ष अतुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत सन २०२१-२२ करिता पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी आर. ए. पी. इंडस्ट्रीजचे दीपक पाटील तर उपाध्यक्षपदी रत्ना उद्योगचे एम. वाय. पाटील, ट्रेझररपदी चौगले सिमेंट पाईप कंपनीचे जयदिप चौगले, ऑ. सेक्रेटरीपदी शगुन कास्टिंगचे श्यामसुंदर तोतला तसेच ‘स्मॅक’ आयटीआयच्या चेअरमनपदी आर. एन. डी. इंडस्ट्रीजचे राजू पाटील व शिरोली सॅण्ड रेक्लमेशन प्लांट चेअरमनपदी श्रीराम फाउंड्री ग्रुपचे नीरज झंवर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
निवडीनंतर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना अतुल पाटील यांचे हस्ते राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांची मूर्ती देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
याप्रसंगी माजी अध्यक्ष अतुल पाटील यांनी त्यांच्या कारकिर्दीतील कामकाजाचा आढावा घेतला. ‘स्मॅक’चे काम आणि सर्व संचालकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी कोल्हापूर फाउंड्री क्लस्टर चेअरमन सचिन पाटील, सेमिनार कमिटी चेअरमन अमर जाधव, संचालक सुरेंद्र जैन, प्रशांत शेळके, जयदत्त जोशिलकर, भरत जाधव उपस्थित होते. आभार प्रदर्शन एम. वाय. पाटील यांनी केले.