• चेंबर ऑफ कॉमर्सची उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे मागणी
कोल्हापूर • प्रतिनिधी
पूरग्रस्त व्यापारी व उद्योजक यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी या पाहणी दौऱ्यावेळी पूरग्रस्त व्यापारी व उद्योजक यांच्या नुकसानीची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, आ. चंद्रकांत जाधव, आ. ॠतुराज पाटील, महानगरपालिका प्रशासक डॉ. कांदबरी बलकवडे, चेंबरचे मानद सचिव, धनंजय दुग्गे व संचालक आनंद माने, अजित कोठारी व प्रशांत शिंदे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनातील मागण्या अशा –
• व्यापारी व उद्योजक यांचे सर्व्हेक्षण व पंचनामे त्वरित व्हावेत व झालेल्या नुकसानीप्रमाणे ताबडतोब मदत मिळावी.
• व्यापार व उद्योग सुरू करण्यासाठी १ लाख रूपये पर्यंतची आर्थिक मदत मिळावी.
• व्यापारी व उद्योजक यांचे कर्जावरील ऑगस्ट महिन्यापासूनचे पुढील ६ महिन्यांचे व्याज माफ व्हावे व कोणतीही कारवाई न करण्याबाबत बँकांना आदेश देणेत यावेत.
• व्यापारी व उद्योजक यांच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी ६ महिन्यांची मुदतवाढ द्यावी व ६ महिन्यांचे व्याज माफ करावे.
• विमा कंपन्यांना सर्व्हेक्षण करून १५ दिवसांच्या आत प्रकरणे निर्गत करण्यासाठी आदेश द्यावेत. त्याचबरोबर अंतरिम रक्कम तात्काळ देण्यास सांगावे.
• जे व्यापारी व उद्योजक ३ दिवसांपेक्षा जास्त पुरात होते, त्यांना रू. २५,००० ची तातडीची मदत करावी.
• व्यापारी व उद्योजक सरकारचा आर्थिक कणा असलेने त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनाने घ्यावी.
अशा सोळा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या आहेत.