•’शिवदुर्ग संवर्धन’ने केली नाम. शंभूराजे देसाईंकडे मागणी
कोल्हापूर • प्रतिनिधी
शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले हे शिवप्रेमींचे प्रेरणास्थान आहेत. अशा पवित्र किल्ल्यांची नावे काही बार आणि वाईन शॉपला दिलेली आहेत. अशा गड-किल्ल्यांची नावे ज्या ज्या बार आणि वाईन शॉपला दिलेली आहेत, ती त्वरित बदलण्यात यावीत. यापुढे अशी नावे असलेल्या बार आणि परमिट रूम, वाईन शॉप यांना परवानगी देऊ नये असा निर्णय शासनस्तरावर व्हावा, तसेच आपल्या सर्व गड-किल्ल्यांवर शासनामार्फत दारूबंदी झाली आहे पण कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडावर बियर बार आणि देशी दारूचे दुकान सुरू आहे ते ताबडतोब बंद व्हावे, दारूबंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी अशी मागणी शिवदुर्ग संवर्धन आंदोलनच्यावतीने गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे केली आहे.
हर्षल सुर्वे, इंद्रजीत सावंत, किरणसिंह चव्हाण, प्रदीप पांडे, विजय दरवान, अर्जुन संकपाळ, विक्रम जगताप, केतन पाटील, अमृता सावेकर, शुभम जाधव, गणेश खोचीकर, प्रिया पाटील, रोहित पानारी आदी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.