शालेय फी सक्तीबाबत युवासेनेची शिक्षण उपसंचालक कार्यालयात निदर्शने

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दि.१४ रोजीच्या ऑनलाईन बैठकीत अन्यायकारक फी शिक्षण संस्थांनी आकारून पालकांची लुट करू नये अशा सक्त सूचना दिल्या असतानाही काही शाळा पालकांकडून जबरदस्ती फी वसुली करत आहेत. लॉकडाऊन काळात शाळांनी शुल्क कपात करणे आवश्यक असल्याचे निर्देश मे.सर्वोच्च न्यायालयाने दिले असतानाही पालकांची लुट सुरूच आहे. या शिक्षण संस्थांची मनमानी थांबवा, अन्यथा शिवसेना स्टाईल दाखवू, असा इशारा युवासेना शहरप्रमुख अॅड.चेतन शिंदे यांनी दिला.
     शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे युवासेनेच्यावतीने शिक्षण संस्थाकडून पालकांच्या होणाऱ्या लुटीबाबत आणि पिळवणूकीबाबत निदर्शने आयोजित करण्यात आली होती. यावेळी  “पालकांची लुट करणाऱ्या शिक्षणसम्राटांचा धिक्कार असो”, “मनमानी कारभार करणाऱ्या शाळांवर कारवाई करा”, “शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे” अशा घोषणांनी शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसर दणाणून सोडला. यानंतर युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचे फलक शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांच्यासमोर फडकविले.
     यावेळी युवासेना शिष्टमंडळाच्यावतीने बोलताना युवासेना शहरप्रमुख अॅड. चेतन शिंदे यांनी, गतआठवड्यात झालेल्या बैठकीत शाळांनी अन्यायकारक फी आकारू नये, असे स्पष्ट निर्देश दिले असतानाही आजही अनेक शाळा पालकांवर फीबाबत सक्ती करत आहेत. मे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रशासनाने शाळांवर अंकुश ठेवणे गरजेचे असताना आजही पालकांची लुट केली जात आहे. यावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. सद्यस्थितीत पूर्णतः अनुदानित शाळाही फी आकारत आहेत. एकीकडे लॉकडाऊन मुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले असताना, शाळांची मनमानी फी भरण्यासाठी पालकांनी पैसे आणायचे कुठून? असा सवाल उपस्थित केला.
      यावर शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांनी, प्रशासनाकडे तक्रारी आल्यानंतर कारवाई करू असे उत्तर देताच युवा सैनिकांनी असे उत्तर अपेक्षित नसल्याचे सुनावत तात्काळ निर्णय देण्याची मागणी केली. प्रसंगी प्रशासनाविरोधात भूमिका घेण्याची ताकित दिली. यावर शिक्षण उपसंचालक श्री.सत्यवान सोनवणे यांनी, उद्या या संदर्भात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण अधिकारी यांची बैठक घेण्याची ग्वाही दिली. यासह मनमानी फी आकारणी करत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा शाळांवर तात्काळ कारवाई करण्याची ग्वाही दिली.
     यावेळी जिल्हा समन्वयक योगेश चौगले, शहरप्रमुख विश्वदीप साळोखे, शहर समन्वयक शैलेश साळोखे, शिवसेना विभागप्रमुख ओंकार परमणे, कपिल सरनाईक, युवासेना आयटीसेल शहरप्रमुख सौरभ कुलकर्णी, युवा सेना विभागप्रमुख अमृत परमणे, अक्षय कुंभार, आदित्य पोवार, प्रथमेश भालकर, प्रसाद पोवार आदी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!