• शनिवारपासून बँकांमधून मिळणार बिलाच्या रक्कमा
कोल्हापूर • प्रतिनिधी
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने १ ते १५ या जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्याची एकरक्कमी एफआरपीची २६ कोटी रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असल्याची माहिती, कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. कारखान्याने तोडणी-वाहतूक बिलेही खात्यांवर जमा केली आहेत. शनिवारपासून (दि.२९) संबंधितांनी बँकांमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन, कारखाना प्रशासनाने केले आहे.
पत्रकात नवीद मुश्रीफ यांनी म्हटले आहे, की जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात गाळप झालेल्या ८८,१७८ टन ऊसाची प्रतिटन २,९६० रुपयेप्रमाणे ऊसबिलाची रक्कम २६ कोटी, १० लाख, ०६ हजार, ५५४ रुपये होते. त्यापैकी, तीन कोटी, ५२ लाख, ५२ हजार, ८११ रुपये विकास सोसायट्यांच्या कर्ज खात्यावर वर्ग केले आहेत. २२ कोटी, ५७ लाख, ५३ हजार, ७४३ रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केले आहेत.
कारखान्यांने आजअखेर सहा लाख टन ऊसगाळप करून ६, ६२, २५० साखर पोती उत्पादित झालेली आहेत. दैनिक १२.११ टक्के, सरासरी ११.२१ टक्के साखर उतारा व दैनिक १३.३० टक्के, सरासरी १२.२२ टक्के बी हेवी साखर उतारा आहे. सहवीज प्रकल्पामध्ये ५, ३६, ०३, ४३० युनिट्स वीज तयार झाली. त्यापैकी ३, ४४, ३४, ००० युनिट्स वीज महावितरणला निर्यात केली आहे. कारखान्याने या हंगामात एक कोटी लिटर इथेनॉल विक्रीचे करार केले आहेत. इथेनॉल प्रकल्पामध्ये ३०, ७०, ४१८ लिटर्स इथेनॉल निर्मिती व १२, ४०, ४१५ लिटर्स रेक्टिफाईड स्पिरिट, असे एकूण ४३, १०, ८३३ लिटर्स इथेनॉल या हंगामात आजअखेर उत्पादित झाले आहे.
शेतकऱ्यांनी पिकविलेला सर्वच्या सर्व ऊस गाळपासाठी कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहनही श्री. मुश्रीफ यांनी केले आहे.