• अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांचे प्रसिद्धीपत्रक
कोल्हापूर • प्रतिनिधी
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने १ ते १५ या डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्याची एकरक्कमी एफआरपीची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असल्याची माहिती, कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. कारखान्याने १६ ते ३१ नोव्हेंबर या कालावधीतील तोडणी-वाहतूक बिलेही खात्यांवर जमा केली आहेत. बुधवारपासून (दि. २९) ही बिले संबंधितांना बँकांमधून मिळणार आहेत.
पत्रकात श्री. मुश्रीफ यांनी म्हटले आहे, डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात गाळप झालेल्या ८६, ७१४ टन ऊसाची प्रतिटन २,९६० रुपयेप्रमाणे ऊसबिलाची रक्कम २५ कोटी, ६६ लाख, ७३ हजार, ४५१ रुपये एवढी होते. त्यापैकी, तीन कोटी, ५० लाख, १८ हजार, ३८५ रुपये एवढी रक्कम विकास सोसायट्यांच्या कर्ज खात्यावर वर्ग केली आहे. २२ कोटी, १६ लाख, ५५ हजार, ०५५ रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा केली आहे.
कारखान्यांने आजअखेर चार लाख, पाच हजार टन ऊसगाळप करून चार लाख, ४१ हजार साखर पोती उत्पादित झालेली आहेत. सरासरी १०.९१ टक्के साखर उतारा व ११.९५ टक्के बी हेवी साखर उतारा आहे. सहवीज प्रकल्पामध्ये ३,६३,९९,५१० युनिट्स वीज तयार झाली. त्यापैकी, २,३४,७४,००० युनिट्स वीज महावितरणला निर्यात केली आहे. कारखान्याने या हंगामात एक कोटी लिटर इथेनॉल विक्रीचे करार केले आहेत. इथेनॉल प्रकल्पामध्ये २२ लाख लिटर्स इथेनॉल निर्मिती व आठ लाख लिटर्स रेक्टिफाईड स्पिरिट असे एकूण ३० लाख लिटर्स इथेनॉल उत्पादित झाले आहे.
गळीत हंगामात ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवलेला आहे, त्यांनी आपापल्या संबंधित बँकांमध्ये व सोसायट्यामध्ये बुधवार दि. २९ डिसेंबरपासून संपर्क साधून ऊस बिलाच्या रकमा व पावत्या घेऊन जाव्यात. तसेच शेतकऱ्यांनी पिकविलेला सर्वच्या सर्व ऊस गाळपासाठी कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहनही श्री. मुश्रीफ यांनी केले आहे.