कोरोना महामारीचे संकट समूळ नष्ट व्हावे यासाठी नाम. मुश्रीफ यांचे साईचरणी साकडं

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      साईबाबा! संपूर्ण जगातील कोरोना महामारीचे संकट समूळ नष्ट कर आणि समस्त मानवजातीला  गतजीवन जगण्याचा आनंद पूर्ववत मिळू दे, असे साकडे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शिर्डीच्या साईचरणी घातले. गुरुवारी (दि.३) सकाळी साडेनऊ वाजता नाम. हसन मुश्रीफ यांनी श्री साईबाबांचे दर्शन घेत मानवजातीच्या कल्याणाचीही प्रार्थना केली.
      शिर्डी येथे बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, यापूर्वी अहमदनगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दोनवेळा शिर्डीमध्ये आलो होतो. परंतु कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने दर्शन झाले नव्हते. मी भाग्यवान आहे, आज दर्शन झाले आणि धन्य वाटले. साईबाबांनी धर्म -पंथ, जात- पातीच्या पलीकडे जाऊन मानवजातीच्या उद्धारासाठी केलेले कार्य महान आहे. कोरोना महामारीमुळे माणसा-माणसातील नातेसंबंध दुरावले असून संपूर्ण जगाचीच ताटातूट झाली आहे. कोरोना महामारीचे हे मळभ दूर होऊन मानवाला गतजीवन जगण्याचा आनंद मिळण्यासाठी श्री साईचरणी लीन होऊन साकड घातलं.
     ध्यास गोरगरीबांच्या सेवेचा…….
     नाम. मुश्रीफ म्हणाले, साईबाबांवर श्रद्धा ठेवून धर्म -पंथ, जात-पात या सगळ्याच्या पलीकडे जाऊन समस्त मानवजातीची सेवा हाच धर्म मानला. आतापर्यंत संपूर्ण आयुष्य जनतेची सेवा करण्यातच व्यतीत केले आहे. हे सेवाकार्यही अपुरेच असल्याची आपली भावना आहे असे सांगतानाच श्री. मुश्रीफ म्हणाले, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत गोरगरीब जनतेची  सेवा अधिक जोमाने व ताकतीने करण्यासाठी निरोगी आणि उदंड आयुष्य मिळू दे!

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!