महावितरण वीज कामगार संघटनांचा वीजबिल थकबाकीमुक्तीचा निर्धार

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोरोना महामारी व त्यानंतर आलेला महापूर याकाळात वाढलेल्या विजबिल थकबाकीमुळे महावितरण कंपनीची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली असून महावितरणचे अस्तित्व टिकविण्यासाठी थकीत वीजबिल वसूल करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. या अनुषंगाने महावितरणच्या वीज कामगार -अधिकारी संघटनांनी एक पाऊल पुढे टाकीत कोल्हापूर परिमंडळातंर्गत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील वीजबिल थकबाकी शून्य करण्याचा निर्धार मुख्य अभियंता परेश भागवत यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत केला आहे.
     सद्यःस्थितीत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात सुमारे ८०० कोटी रुपये वीजबिल थकबाकी आहे. महावितरणला दैनंदिन कारभार व वीज खरेदी करिता नियमित अर्थपुरवठा होणे गरजेचे आहे. दरमहा वीज बिल वसुलीच्या महसुलावरचं महावितरणची  भिस्त अवलंबून असल्यामुळे या कठीण काळात १०० टक्के वीज बिल वसुली होणे आवश्यक आहे. ग्राहकांना अखंडित, दर्जेदार व सुरळीत वीज पुरवठा देण्याची जबाबदारी  महावितरणवर आहे. तेंव्हा वीज ग्राहकांनाही आपली मासिक वीज देयके नियमित भरणा करून  महावितरणला ही जबाबदारी पेलण्यासाठी आर्थिक पाठबळ  देणे तेवढेच आवश्यक आहे.
     वीज कामगार संघटनांच्या पुढाकारातून कोल्हापूर परिमंडळ व सांगली मंडळ कार्यालयात वीजबिल थकबाकी सद्यःस्थिती व वसुलीसाठीचे नियोजन याबाबत सविस्तर चर्चा  करण्यात आली. या बैठकीत संघटना प्रतिनिधींनी नेहमी वीजबिल थकबाकीमुक्त असणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पुन्हा वीजबिल वसुलीचे १०० टक्के उद्दिष्ट साध्य करून महावितरण कंपनीचे अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला.
     या बैठकीस मुख्य अभियंता परेश भागवत, अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंता व संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!